रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना

मुंबई, दि. ८ : जीआरपीकडून प्राप्त माहितीनुसार, 2022, 2023 आणि 2024 मध्ये ब्लॉक विभागात अनुक्रमे 1764, 1880 आणि 1692 अनैसर्गिक मृत्यू तर स्थानकांवर 662, 656 आणि 781 अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. या आकडेवारीत गाडीमधून पडणे, अवैध प्रवेश (अनधिकृतपणे रूळ ओलांडणे) आणि खांबावर आदळणे इत्यादी विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे.
मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या एसी लोकल गाड्या सुरू करणे हा प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गर्दीशी संबंधित घटना कमी करण्याच्या दिशेने एक स्वागतार्ह उपक्रम आहे. स्वयंचलित दरवाजे प्रवाशांना फूटबोर्डवर लटकण्यापासून किंवा चालत्या गाडीत चढण्यापासून रोखतात जे प्राणघातक अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. गाडी चालू असताना हे दरवाजे बंद राहतात आणि गाडी केवळ स्थानकांवर थांबल्यावरच उघडतात, ज्यामुळे पडण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजना सुरू केली आहे. यामध्ये दीर्घकालीन दृष्टिकोनासह स्थानकांचा निरंतर विकास करण्याचा विचार मांडला आहे .
आतापर्यंत, महाराष्ट्र राज्यातील 132 स्थानकांसह 1337 स्थानके या योजनेअंतर्गत विकासासाठी निवडण्यात आली आहेत.
भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये हाती घेतलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे, अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. खालील आलेखात दाखवल्याप्रमाणे, परिणामी रेल्वे अपघात 2014-15 मधील 135 वरून 2024-25 मध्ये 31 पर्यंत कमी झाले आहेत.
2004-14 या कालावधीत 1711 (वर्षाला सरासरी 171) महत्वपूर्ण रेल्वे अपघात झाले होते, ज्यात 2024-25 मध्ये 31 पर्यंत आणि 2025-26 मध्ये (जूनपर्यंत) 3 पर्यंत घट झाली आहे.
रेल्वे परिचालनातील सुधारित सुरक्षितता दर्शविणारा आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे प्रति दशलक्ष ट्रेन किलोमीटर अपघात (APMTKM) प्रमाण जे 2014-15 मध्ये 0.11 होते ते 2024-25 मध्ये 0.03 पर्यंत कमी झाले आहे, जे या कालावधीत सुमारे 73% सुधारणा दर्शविते.
जून 2025 पर्यंत, भारतीय रेल्वेने रेल्वेचे कामकाज आणि प्रवाशांची सुरक्षितता सुधारण्यासाठी व्यापक सुरक्षा आणि आधुनिकीकरण उपाययोजना राबवल्या आहेत. पॉइंट्स आणि सिग्नल्सचे केंद्रीकृत नियंत्रण करण्यासाठी 6,600 हून अधिक स्थानके इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमने सुसज्ज करण्यात आली आहेत, ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी होतात. याव्यतिरिक्त, या संवेदनशील ठिकाणी सुरक्षितता वाढविण्यासाठी 11,096 लेव्हल क्रॉसिंग गेट्स इंटरलॉक केले आहेत, तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रॅक ऑक्युपन्सीचे निरीक्षण करण्यासाठी 6,640 स्थानकांवर संपूर्ण ट्रॅक सर्किटिंग लागू करण्यात आले आहे.
2020 मध्ये राष्ट्रीय स्तरावर अवलंबण्यात आलेली प्रगत “कवच” ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली हळूहळू तैनात केली जात आहे, ज्यामध्ये दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य रेल्वेसह महत्त्वाचे मार्ग समाविष्ट असून दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा सारख्या प्रमुख कॉरिडॉरचा विस्तार सुरू आहे. जुलै 2025 मध्ये कोटा-मथुरा विभागात ती यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली.
उच्च-शक्तीचे रूळ , प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट स्लीपर आणि प्रगत फास्टनिंग सिस्टम यासारख्या आधुनिक ट्रॅक घटकांच्या वापराद्वारे रेल्वेरूळांवरील सुरक्षितता मजबूत करण्यात आली आहे. विशिष्ट यंत्रसामग्रीद्वारे रूळ टाकण्याचे यांत्रिकीकरण मानवी चुका कमी करते. लांब रेल्वे पॅनेलच्या पुरवठ्यामुळे जॉईंट वेल्डिंग कमी होते आणि अल्ट्रासोनिक दोष शोध प्रणालीमुळे वेळेत सदोष रूळ काढणे शक्य होईल. फ्लॅश बट वेल्डिंगसारख्या सुधारित वेल्डिंग तंत्रज्ञानाला पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत प्राधान्य दिले जाते.
रेल्वे सोशल मीडिया, डिजिटल आणि प्रिंट मीडियाचा वापर करून प्रवाशांना असुरक्षित पद्धतींपासून सावध करण्यासाठी विविध जनजागृती आणि संवेदनशीलता मोहिमा राबवते. स्थानकांवर लाऊडहेलर आणि सार्वजनिक जनसंबोधन प्रणालींद्वारे वारंवार घोषणा केल्या जातात, ट्रॅक ओलांडणे , चालत्या गाडीत चढणे आणि फूटबोर्डवरून प्रवास करणे टाळण्याविषयी सावध केले जाते. स्थानकांवर रेल्वे डिस्प्ले नेटवर्कवर प्रवासी जागरूकता संबंधी छोट्या चित्रफिती दाखवल्या जात आहेत. जनतेला सावध करण्यासाठी संवेदनशील अनधिकृत प्रवेशाच्या ठिकाणी हिंदी आणि मराठीमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अशा ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ ) कर्मचारी तैनात केले आहेत आणि ट्रेनच्या छतावर, फूटबोर्डवरून किंवा इतर प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.