#रेल्वे अर्थसंकल्प प्रवाशांना निराश करणार की दिलासा देणार

 #रेल्वे अर्थसंकल्प प्रवाशांना निराश करणार की दिलासा देणार

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प 2021 सादर केला जाईल. तारखांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय सत्राचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले गेले आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या दिवशी साधारण व्यक्ती असो अथवा खास प्रत्येक व्यक्तीचे डोळे रेल्वेच्या अर्थसंकल्पावर असतात. परंतू यावेळी रेल्वे अर्थसंकल्पाची वाट पहाणार्‍यांची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण असे म्हटले जात आहे की 2021 च्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी कोणतीही मोठी भेट असणार नाही. रेल्वेचे अंदाजपत्रक गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत केवळ 3-5 टक्केच वाढू शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
रेल्वे मंत्रालयाने पुढील आर्थिक वर्षासाठी सुमारे 1.80 लाख कोटी च्या अंदाजपत्रकाचा आराखडा वित्त मंत्रालयासमोर ठेवला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी कोरोना विषाणू साथीचा संदर्भ देत ही प्रचंड मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविली आहे. या पार्श्वभुमीवर रेल्वे प्रवाश्यांनी या अर्थसंकल्पाकडून जास्त अपेक्षा ठेवू नयेत हे स्पष्ट झाले आहे.
रेल्वे मंत्रालयाशी संबंधित एका सुत्राने सांगितले की, 2021-22 या आर्थिक वर्षाचे रेल्वे अंदाजपत्रक 1.70 लाख कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर केंद्राकडून रेल्वेला मदत म्हणजेच एकंदर अर्थसंकल्पीय सहकार्य देखील यावेळी सुमार 75000 कोटी रुपयेच असू शकते.
सुत्रांच्या मते रेल्वे अर्थसंकल्पात यावेळी खासगी ट्रेन, नवीन रेल्वे संचांद्वारे नवीन मार्गावर जलद प्रवास, पर्यटनस्थळांकरिता उत्तम रेल्वे जोडणी, सौर पॅनेलवर आधारित हरित उर्जा यावर भर, किसान रेल्वे सेवेचा विस्तार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये रेल्वे जोडणीसाठी पायाभुत विस्तारावर लक्ष केंद्रित केले जाईल.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल आणि ते 2 भागात एप्रिलपर्यंत चालेल. यंदाचा अर्थसंकल्प खूपच विशेष असणार आहे, याच संकेत खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. हा अर्थसंकल्प कोरोना संकटाच्या काळातून जात असलेल्या देशाची स्थिती व दिशा दोन्ही निश्चित करेल. यासाठीच अपेक्षा देखील खूप जास्त आहेत.
Tag- Railway/Budget
PL/KA/PL/16 JAN 2021

mmc

Related post