राहुल गांधींनी घेतली मणिपूरच्या विस्थापितांची भेट
गुवाहाटी, दि. ८ (एमएमसी न्यूज नेते ) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या कछार जिल्हयातील मणिपूर मधील हिंसाचारात होरपळलेल्या निर्वासितांच्या छावणीत राहात असलेल्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सुमारे १ हजार ७०० लोक आसाममध्ये आश्रयाला आले आहेत.त्यांची आस्थेने विचारपूस करून मणिपूरचा मुद्दा संसदे उपस्थित करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळून आला होता.त्यानंतर जीव वाचविण्यासाठी अनेकजण आसाममध्ये पळून आले. या विस्थापितांनी आपल्या समस्यांचे निवेदन राहुल गांधी यांना दिले. आपली विचारपूस करणारे राहुल गांधी हे पहिलेच नेते आहेत,अन्य कोणीही आपली दखल घेतली नाही,असे विस्थापितांनी सांगितले.आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास राहुल गांधी कछारच्या विस्थापितांच्या छावणीत पोहोचले. सुमारे २० मिनिटे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते गाडीने मणिपूला रवाना झाले.
मणिपूरच्या दौऱ्यावर त्यांनी जिरीबाम जिल्ह्यात जाऊन तेथील उच्च माध्यमिक शाळेतील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली.दरम्यान, राहुल गांधी यांच्या भेटीची माहिती देताना काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष देवब्रत यांनी पंतप्रधान मोदींवर मणिपूरबाबत खोटे बोलल्याचा आरोप केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत मणिपूरमधील स्थिती सामान्य होत आहे असे सांगितले. ते साफ खोटे आहे.प्रत्यक्ष तेथील स्थिती किती भयंकर आहे हे छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या मणिपूरच्या विस्थापितांनी सांगितले. केंद्र सरकारने आपल्यासाठी काहीही केले नाही,असे विस्थापितांचे म्हणणे आहे, असे देवब्रत म्हणाले.
SL/ML/SL
8 July 2024