#अर्थसंकल्पात गरीब आणि एमएसएमईला मदत करण्यासाठी उपाय केले तरच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल – रघुराम राजन यांची सूचना

 #अर्थसंकल्पात गरीब आणि एमएसएमईला मदत करण्यासाठी उपाय केले तरच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल – रघुराम राजन यांची सूचना

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेअर बाजार सध्या विक्रमी उंचीवर आहे. म्हणूनच सरकारने आपल्या कंपन्यांमधील आपला हिस्सा विकायला हवा अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की ही वेळ गरीब कुटुंबे आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मदत करण्याची आहे. यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ शकेल. राजन यांनी आगामी अर्थसंकल्पासाठी या सूचना केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सरकारने पायाभूत सुविधांवर खर्च वाढवणे. सरकारी खर्चातील अर्ध्याहून अधिक हिस्सा राज्यांचा असतो, म्हणूनच त्यांना पैसे दिले पाहिजेत. आर्थिक वर्ष 2021-22 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.
खर्च वाढल्यानंतर नुकसान वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे राजन यांनी सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला पैशांची अडचण असेल तर तुम्ही समभाग विकायला हवेत. सरकार असे का करीत नाही? त्यांना कोण रोखत आहे? जर मी असतो तर आत्ताच शेअर बाजाराच्या तेजीचा फायदा घेतला असता.”
एप्रिल-जून 2020 मध्ये जीडीपी 23.9 टक्के घटला होता. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतही 7.5 टक्के नकारात्मक वाढ झाली आहे. राजन यांनी सांगितले की परिस्थिती बदलेल हे निश्चित आहे. परंतू प्रश्न असा आहे की परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करीत आहोत? जागतिक बँकेचा अंदाज आहे की परिस्थिती सुधारेपर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेला 900 अब्ज डॉलर (66 लाख कोटी रुपये) चे नुकसान झालेले असेल. हे आपल्या जीडीपीच्या एक तृतीयांश इतके आहे. राजन यांचा अंदाज आहे की 2022 च्या दुसर्‍या सहामाहीच्या आधी भारताची अर्थव्यवस्था कोरोना साथीच्या आधीच्या पातळीवर पोहोचू शकणार नाही. अर्थव्यवस्था सरकारच्या वाढीव खर्चामुळे नव्हे तर त्याच्या मूलभूत कारणांसाठी वाढेल. दरवर्षी आपल्या कामगारशक्तीत सामील होत असलेल्या कोट्यावधी लोकांसाठी आपण रोजगार निर्माण करण्याची गरज आहे.
Tag- Raghuram Rajan/Budget/Economy
PL/KA/PL/15 JAN 2021

mmc

Related post