बांगलादेशात आंदोलकांचा सर्वोच्च न्यायालयाला घेराव, सरन्यायाधीशांचा राजीनामा
ढाका, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडणारे बांगलादेशी आंदोलक दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना आहेत. आज शेकडो बांगलादेशी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांनी दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. जमावाने इतर न्यायाधीशांनाही त्यांची पदे सोडण्यास सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी मुदतीपूर्वी राजीनामा न दिल्यास न्यायाधीशांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची देखील धमकी दिली होती. यानंतर सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि ते पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निष्ठावंत मानले जातात.
सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थी आणि वकिलांसह शेकडो आंदोलकांनी सरन्यायाधीश आणि अपीलीय विभागाच्या न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराला घेराव घातला. दरम्यान, हंगामी सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद यांनी फेसबुकवर पोस्ट करत सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा बिनशर्त राजीनामा द्यावा आणि पूर्ण न्यायालयाची बैठक थांबवावी, अशी मागणी केली.
या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांनी न्यायालयाचे कामकाज व्हर्च्युअल पद्धतीने चालणार की नाही याचा निर्णय घेण्यासाठी बोलावलेली बैठक व न्यायालयीन कामकाज पुढे ढकलले. सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निष्ठावंत मानले जातात. आंदोलकांच्या मागणी नंतर त्यांनी देखील राजीनामा दिला आहे.
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत सोमवारी हेलिकॉप्टरने भारतात दाखल झाल्या. यानंतर आंदोलकांनी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू केला. परराष्ट्र व्यवहार सल्लागार आणि माजी परराष्ट्र सचिव मोहम्मद तौहीद हुसेन यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करणे हे या वेळी अंतरिम सरकारचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.
‘UNB’ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बांगलादेशने सर्व देशांशी चांगले संबंध ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “आम्हाला सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. मोठ्या देशांसोबतच्या संबंधात समतोल राखण्याची गरज आहे,” असे सेन यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता सांगितले. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस (वय ८४) यांनी गुरुवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी संसद बरखास्त केल्यानंतर युनूस यांची हंगामी सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.
SL/ML/SL
10 August 2024