पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह घेतला क्रिकेटचा आनंद
![पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह घेतला क्रिकेटचा आनंद](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/03/Modi-Anthany.jpg)
नवी दिल्ली, 9 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमधील अहमदाबादच्या नरेन्द्र मोदी मैदानावर सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या चौथ्या कसोटी सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आज उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “क्रिकेटची आवड हा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला समान धागा आहे! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या काही क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत अहमदाबादमध्ये आल्याचा आनंद झाला. मला खात्री आहे की हा एक रोमांचक सामना असेल!”
पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे आगमन झाल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी त्यांचा सन्मान केला. गायिका फाल्गुई शाह यांच्या युनिटी ऑफ सिम्फनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आनंद घेतला.
पंतप्रधानांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माला तर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला कसोटी सामन्याची टोपी दिली. यानंतर पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी गोल्फ कार्टमधून फेरी करत स्टेडियममधील भव्य जनसमुदायाकडून मानवंदना स्विकारली.
दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी खेळपट्टीवर गेले असताना उभय पंतप्रधान फ्रेंडशिप हॉल ऑफ फेम पाहण्यासाठी गेले. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू, रवी शास्त्री यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध क्रिकेट इतिहासाची माहिती दिली.
यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या पंतप्रधानांसोबत मैदानावर गेले. दोन्ही कर्णधारांनी पंतप्रधानांना संघाची ओळख करून दिली. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत झाले. तत्पश्चात पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान क्रिकेटमधील दोन दिग्गजांचा कसोटी सामना पाहण्यासाठी अध्यक्षीय कक्षात गेले.
SL/KA/SL
9 March 2023