सोलापुरात यशस्वी झाला पिस्ता शेतीचा प्रयोग
सोलापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर सारख्या कोरडवाहू भागात दुष्काळाचे आव्हान पेलत अनेक शेतकरी वैविध्यपूर्ण शेतीचे प्रयोग यशस्वी करत आहेत.सोलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात बळीराम राऊ भोसले यांनी पिस्ता लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे. बळीराम भोसले हे अल्पशिक्षित शेतकरी आहेत मात्र परंतु शेतीवर प्रचंड आस्था आणि कुतूहल यातून त्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब ते थेट काश्मीरमधील शेतीप्रयोग पाहीले. त्यातूनच नवीन प्रेरणा घेत त्यांनी चक्क सफरचंदाची शेती करण्याचे ठरविले. सुमारे दीड एकर क्षेत्रात सफरचंदाची बाग सध्या फुलून गेली असून उत्पादन सुरू झाले आहे. सफरचंदाच्या पाठोपाठ भोसले यांनी चक्क पिस्त्याची शेती करण्याचा ध्यास घेतला.
पिस्ता शेती सुरू करून चार वर्षे झाली. पिस्त्याचा पहिला बहार आला असता तो बाजारात विकायला न नेता भोसले यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना, पै-पाहुण्यांना मोफत वाटला आहे. त्यातून त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या पिस्ता शेतीची महती हळूहळू दूपर्यंत पसरली आहे. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही उत्सुकतेपोटी बळीराम साठे यांच्या पिस्ता शेतीप्रयोगाला भेट देऊन माहिती घेतली.
पिस्ता शेतीसाठी अतिथंड हवामानाबरोबरच अतिउष्ण हवामान असावे लागते. या भौगोलिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून भोसले यांनी आपल्या गावशिवारातही असेच भौगोलिक वातावरण असल्यामुळे त्यांनी पिस्ता शेती करण्याचा निर्णय घेतला आणि दूरवरच्या उत्तर प्रदेशातील साहरनपूरच्या एका नर्सरीशी संपर्क साधला. तेथून पिस्त्याची ४० रोपे खरेदी केली. प्रत्येकी दोनशे रुपये दराने खरेदी केलेल्या पिस्ता रोपांची १५ गुंठे क्षेत्रात लागवड केली. ही सर्व रोपे शंभर टक्के जिवंत राहून यशस्वी झाली आहेत.माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करताना यू टय़ूबच्या आधारे बळीराम भोसले यांनी शेतात पिस्ता रोपांची लागवड केली. त्यासाठी हलक्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत १२ फूट बाय १४ फूट अंतरावर खोल खड्डा मारून त्यात रोप लागवड केली. त्यावर देखभालीचा जास्त खर्च झाला नाही.
शेणखताचा वापर करून रोपे वाढवली. एकेका झाडाला ठरवून २० लिटर पाणी ठिबक सिंचनाद्वारे दिले. मात्र ठिबक सिंचन झाडाजवळ फूटभर अंतर ठेवले. कोणतीही औषध फवारणी केली नाही. मजूरही लागले नाहीत. तीन वर्षांनंतर पिस्ता झाडांना फुलोरा आला. पहिल्यांदाच बहार आल्यानंतर एकेका झाडावर एक किलो पिस्ता मिळाला.
बळीराम भोसले यांच्या मध्यम प्रतीच्या शेतजमिनीत पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर प्रत्यक्ष पिकांना वेळोवेळी नियोजनाप्रमाणे पाणी देण्यासाठी अर्थात वीजपुरवठा महत्त्वाचा होता. दररोज कमी दाबाने आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ावर भोसले यांनी उपाय शोधला. स्वत:च्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीज समस्या कायमची मिटवली आहे. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जोखीम पत्करून रात्री-अपरात्री जावे लागत नाही. विजेसाठी एक पैशाचे बिलही भरावे लागत नाही.
SL/ML/SL
10 June 2024