राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार महाराष्ट्र महोत्सव…

 राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार महाराष्ट्र महोत्सव…

मुंबई दि.२२ – संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पूर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंटल आणि सेल राज्यप्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतली तसेच पक्षाच्या प्रदेश फ्रंटल आणि सेलच्या राज्यप्रमुखांना महाराष्ट्र महोत्सवाचा कार्यक्रम दिला.

महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणारे कार्यक्रम या महाराष्ट्र महोत्सवात आयोजित करावेत अशा सूचनाही सुनिल तटकरे यांनी प्रदेश पदाधिकार्‍यांना यावेळी दिल्या. ‘महाराष्ट्र महोत्सवा’ निमित्त राजधानी मुंबईत १ ते ३ मे दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अमरावती या प्रशासकीय विभागात स्थानिक मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आणि ओळख अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित ‘महाराष्ट्र महोत्सव’ राज्यभरात पक्षाचा कार्यक्रम म्हणून साजरा करताना महाराष्ट्राची ओळख आणि संस्कृती अधोरेखित करणार्‍या संकल्पना सुचवण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या बैठकीत केली. मुंबईसह राज्यभरातील सर्व सहा विभागात संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा १ मे दिन ”महाराष्ट्र महोत्सव’ भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याच्या सूचना तटकरे यांनी केल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने १९ फेब्रुवारी रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘स्वराज्य सप्ताह’ तर २७ फेब्रुवारी रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिन सोहळया’चे भव्यदिव्य आयोजन केले होते आणि आता संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *