राष्ट्रीय युवा दिन : सदैव सकारात्मक विचार देणारे स्वामी विवेकानंद कालातीत युवा प्रेरणास्थान
मुंबई, दि. 12 (राधिका अघोर): देशातल्या विद्वान आध्यात्मिक विचारवंतांपैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद वयाने तर तरुण नेते होतेच, पण त्यांचे विचार 100 पेक्षा अधिक काळ जुने असले तरीही, आजच्या युवकांनाही प्रेरणादायक आणि दिशादर्शक ठरतील, असे होते.
विवेकानंद बंगालमधल्या अतिशय सुस्थित आणि सुशिक्षित कुटुंबात जन्मले होते. मात्र, ते तरुणवयात जाईपर्यंत त्यांच्या कुटुंबावर अनेक अडचणी, संकटे कोसळली. याच काळात नरेंद्रनाथ दत्त आध्यात्माकडे वळले. मात्र निराशेतून नव्हे तर भौतिक शक्तीच्या पलीकडे असलेल्या पारलौकिक शक्तींविषयी जे कुतूहल, शंका त्यांच्या मनात होत्या,त्यातून ते अध्यात्माचा अभ्यास करू लागले.
विज्ञानवादी असलेल्या नरेंद्र नाथांना चमत्कार, देवीदेवता याबद्दल अनेक प्रश्न पडत असत. त्याबद्दल त्यांचा त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी तासनतास वादविवाद, चर्चा चाले. हे सांगण्याचं कारण असं, की केवळ ईश्वराप्रती भारावून जात, भक्तिभावाने किंवा आपल्या परंपरा आहेत म्हणून त्यांनी आध्यात्माचा अभ्यास केला नाही, तर चिकित्सक बुद्धीने त्यांनी हा अभ्यास केला.
इतर धर्म संस्कृतींचाही अभ्यास केला. आणि त्यांना भारतीय हिंदू तत्वज्ञानाचं सर्वसमावेशक वेगळेपण त्यात सापडलं. म्हणूनच, 1893 मध्ये अमेरिकेत झालेल्या विश्व धर्मसंसदेत भारताचं प्रतिनिधी म्हणून ते अत्यंत योग्य ठरले. ज्या देशाबद्दल युरोप अमेरिकेत अतिशय गैरसमज निर्माण होतील, असा दुष्प्रचार झाला असतांना त्यांनी खरं, व्यापक, सहिष्णू हिंदू तत्वज्ञान जगासमोर मांडलं.
अस्खलित शब्दांत, ठामपणे या युवा स्वामीजींनी हिंदू धर्म लोकांसमोर आणला, गीता, वेद आणि अध्यात्म जगाला सांगितलं. हिंदू धर्माचे सर्वसमावेशक सिद्धांत मांडले. जणू भारताविषयी पाश्चिमात्य देशात असलेलं हिनतेचे किटाळ, मळभ बाजूला करुन हिंदू तत्वज्ञानाचा निरभ्र पटल त्यांनी जगासमोर आणला. त्यांना अमेरिकेच्या लोकांनी ‘सायक्लॉनिक हिन्दू’ म्हणजे ‘हिंदू वादळ’ अशी उपाधी दिली.
वयाच्या 25 व्या वर्षी भगवी वस्त्रे नेसणाऱ्या या संन्याशाला खरे तर आध्यात्माच्या ज्ञानात बुडून जायचे होते, मात्र त्यांच्या गुरूंनी केलेल्या आज्ञेनुसार, त्यांनी संपूर्ण भारत पहिला. भारताचं तत्वज्ञान, देशात असलेलं ज्ञानाचं भंडार, मात्र दुसरीकडे देशाची झालेली विकल, दारुण अवस्था, गुलामी अज्ञान, गरीबी, अंधश्रद्धा, आजार यात पिचलेला देश असा विरोधाभास त्यांना जाणवला. या देशाला भारतीयत्वाकडे, आपल्याच मूळ ज्ञानाकडे आणण्याची गरज आहे, देशातील जनतेत राष्ट्राभिमान निर्माण करण्याची गरज आहे, तेव्हाच पुन्हा एकदा आपला देश परमवैभवाला पोचेल, हे त्यांना लक्षात आलं आणि पुढे हेच त्यांचं जीवितकार्य झालं.
यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, ज्याचं कार्य आजही देश विदेशात सुरू आहे.
स्वामीजींचे तत्वज्ञान यासाठी युवकांना प्रेरणादायी आहे कारण त्यात आध्यात्माची डूब असली तरी कुठेही जगण्याविषयीची अनासक्ती नाही, नकारात्मकता नाही. तर संपूर्ण ओज, तेज आणि सकारात्मकतेने भारलेले त्यांचे विचार आहेत.
म्हणूनच आजही निराशेच्या गर्तेत सापडलेल्या युवकांना ते प्रेरणा देऊ शकतात. त्यांच्या विचारात अत्यंत स्पष्टता आहे. देशभक्ती आहे. अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे आलेल्या तरुणांना त्यांनी आधी मैदानावर फूटबॉल खेळून, आपली प्रकृती मजबूत करण्याचा सल्ला दिला होता.
‘उठा, जागृत व्हा, आणि जोपर्यंत तुमचं उद्दिष्ट साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका’ असा मंत्र तरुणांना दिला, जो साखळी ज्ञानाच्या स्वरूपात पिढ्यानपिढ्या पोचवला जातो आहे. देशात परसलेले अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा, कुप्रथा यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. हे भारतीय तत्वज्ञान नाही, मनुष्यसेवा हा हिंदू धर्म आहे.
पाश्चिमात्य देशात असलेल्या भौतिक, वैज्ञानिक प्रगतीची भारताला गरज आहे आणि भारताकडे असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची, शांतीची पाश्चिमात्य देशांना गरज आहे. त्यामुळे यांची सांगड घालण्याचा आग्रह त्यांनी धरला. आजही त्यांचे हे तत्वज्ञान लागू पडते.
मेकॉलेच्या कारकून निर्माण करणाऱ्या शिक्षणपद्धतीला विरोध करत त्यांनी सर्वांगीण उन्नती करणाऱ्या भारतीय शिक्षणाचा आग्रह धरला. व्यवहारीक आणि भविष्यासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण देण्याचा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच त्यांना ‘योद्धा संन्यासी’ असे म्हटले जाते.
भारतीय तत्वज्ञानाचा जागतिक मंचावर खणखणीतपणे पुरस्कार करणारे, त्याचवेळी युवकांमध्ये देशभक्ती आणि लढण्याची ऊर्जा भरणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती हा देशाचा ‘युवा दिन’ असणे, हीच खरी भारतीयत्वाची ओळख आणि अभिमानही आहे.National Youth Day: Ever positive thinker Swami Vivekananda timeless youth inspiration
RG/KA/PGB
12 Jan. 2023