राष्ट्रीय सुरक्षा दिवस

 राष्ट्रीय सुरक्षा दिवस

मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन):  ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’- बसचालकाच्या समोरच लिहिलेले हे वाक्य दररोज शंभर टक्के पाळण्याचा खरेतर आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. रस्ते सुरक्षा, कामाच्या ठिकाणची सुरक्षा, आरोग्यसुरक्षा, पर्यावरणीय सुरक्षा अशा विविध पैलूंविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून दरवर्षी पाळला जातो.

स्वतःच्या, इतरांच्या आणि परिसराच्याही सुरक्षेची काळजी घेण्याचे उत्तरदायित्व प्रत्येकाने ओळखावे आणि त्यासाठी सदैव जागरूक राहावे याकरिता हा दिवस पाळला जातो. काही वेळा काही शब्दांची ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ होते. सुरक्षा ही संज्ञा त्यापैकीच एक. सुरक्षा दिवस साजरा करताना, सुरक्षेचा अर्थ काय, हे आधी लक्षात घेणे अगत्याचे आहे. अगदी सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींपासून ते जीवनविम्यापर्यंत बऱ्याचदा ‘जपणूक’, ‘काळजी’ अशा अर्थी वापरल्यामुळे हा शब्द गुळगुळीत झाला आहे. म्हणूनच या संज्ञेची नेमकी व्याप्ती किती? तर- शारीरिक, मानसिक इजा पोहोचवणाऱ्या, मालमत्तेची हानी करणाऱ्या धोकादायक घटनांवर नियंत्रण प्रस्थापित करून व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे आरोग्य आणि स्वास्थ्य संतुलित राखण्यालाच आपण सुरक्षा असे म्हणतो. ४ मार्च १९६६ या दिवशी केंद्रीय कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना केली. कारखाने आणि कामाच्या ठिकाणी अपघातांना प्रतिबंध घालून सुरक्षेची काळजी घेणे, याबरोबरच कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित, आरोग्यपूर्ण तसेच पर्यावरणपूरक वातावरण सांभाळण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. कालांतराने एन.एस.सी.चा स्थापना दिवस हाच राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून पाळला जाऊ लागला.

या दिनानिमित्त उद्योगजगत, कामगार संघटना, सरकारी विभाग, नियामक संस्था, सामाजिक संस्था आणि प्रसारमाध्यमे आठवडाभर सुरक्षाविषयक जागृती मोहीम चालवतात. यू.एन.डी.पी. म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने जगाच्या संतुलित विकासासाठी निश्चित केलेल्या १७ विकासोद्दिष्टांमध्ये (एस.डी.जी.) तिसऱ्या क्रमांकाचे उद्दिष्ट आहे- व्यवसायविषयक सुरक्षा आणि आरोग्य. या उद्दिष्टाला अनुसरून राष्ट्रीय सुरक्षा परिषद वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेते.

यावर्षीच्या राष्ट्रीय सुरक्षा दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे- ‘अवर एम, झिरो हार्म’- म्हणजे- ‘शून्य नुकसान हेच आमचे ध्येय’! ‘घर ते कामाची जागा आणि परत’ असा कोणत्याही कामगाराचा संपूर्ण प्रवास, काम सर्व काही- सुरक्षित असले पाहिजे, यावर या संकल्पनेचा भर आहे. त्यामुळे अर्थातच, एकमेकांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची जबाबदारी ठरते.

कारखान्यांमध्ये अनवधानाने होणाऱ्या दुर्घटना, उपकरणे जुनाट झाल्यामुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगी, रस्त्यावरील वाहनांच्या बाबतीत – वेगामुळे तसेच नियम पाळण्याविषयीच्या बेफिकिरीमुळे होणारे अपघात, इमारत धोकादायक होऊनही तिचा वापर सुरु ठेवण्याने होणाऱ्या दुर्घटना, बांधकामाच्या अटी न पाळता उभारलेल्या इमारती, आगीच्या शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने घातलेल्या अटी धुडकावून उभारलेल्या वास्तू … जीविताच्या अथवा मालमत्तेच्या सुरक्षेला आह्वान देणारी अशी कित्येक उदाहरणे देता येतील.

अशा प्रत्येक वेळी झालेल्या दुर्घटनेचे यथातथ्य विश्लेषण केले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे. यात – कोणताही निष्काळजीपणा न करता आवश्यक ती सुरक्षासामग्री- जसे गॉगल, ग्लोव्ज, वगैरे- घालणे, यंत्रे व उपकरणांची नियमित तपासणी, देखभाल, संकटप्रसंग उद्भवल्यास सुटकेबाबतचे प्रशिक्षण, मॉक-ड्रिल अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. आणीबाणीच्या प्रसंगी समाजमाध्यमांचा वापर करण्याबद्दल- खरे तर समाजमाध्यमांचा वापर न करण्याबद्दल- प्रशिक्षण देणे हीदेखील आताच्या काळाची गरजच म्हटली पाहिजे.

वास्तविक पाहता, कोणत्याही समस्येचे शाश्वत म्हणजे- पिढ्यानुपिढ्या चालणारे उत्तर शोधण्यासाठी, उगवत्या पिढीवर संस्कार करणेच महत्त्वाचे असते. म्हणूनच गेल्यावर्षी सुरक्षादिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेत- ‘सुरक्षा संस्कृती विकसित करण्यासाठी लहान वयाच्या / तरुण व्यक्तींवर सुरक्षेचा संस्कार करण्यावर’, भर देण्यात आला होता. खरे तर, व्यक्ती आणि परिसराचे हित जपण्याची सुरुवात आपल्या वृत्ती आणि मानसिकतेपासूनच होते.

यासाठी उलट अर्थाचे उदाहरण पाहू- अगदी क्षणिक सोय पाहून चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणारी व्यक्ती नकळत कोणाच्यातरी जीविताच्या सुरक्षेशी तडजोड करत असते. कारखान्याच्या द्रव उत्सर्गावरील प्रक्रियेचा खर्च टाळणारा कारखानदार जाणीवपूर्वक असंख्य जीवांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षेशी खेळ करत असतो.

घाई, आळस, फसवा मोह अशा अनेक निसरड्या कारणांनी निर्माण होणारी असुरक्षितता हे आपल्यासमोरचे खरे आह्वान होय. म्हणूनच मनाची माती ओली असतानाच सुरक्षेचा संस्कार होणे महत्त्वाचे ठरते. हाच संस्कार घेऊन यावर्षीच्या सुरक्षादिनानानिमित्त, शून्य नुकसानाच्या ध्येयासाठी वचनबद्ध होऊया!national security day

ML/KA/PGB
5 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *