लवकरच सुरू होणार नाशिक-बंगळुरू विमानसेवा

नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १० सप्टेंबरपासून ओझर विमानतळावरून बेंगळुरूसाठी दररोज थेट विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेची बुकिंगही सुरू झाली आहे. उद्योग, पर्यटन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिकच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. बेंगळुरू येथून दररोज दुपारी २.३० वाजता १८० आसनी विमान उड्डाण घेऊन ते सायंकाळी ४.२० वाजता नाशिकला पोहोचेल. हेच विमान सायंकाळी ४.५० वाजता नाशिकहून भरारी घेऊन ६.३५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल. या सेवेचे बुकिंग सुरू झाले असून, सुमारे साडेचार हजारांपासून पुढे तिकीटदर राहतील.
थेट बेंगळुरू सेवेने नाशिकला दक्षिण भारताची कनेक्टिव्हिटी लाभणार असून, तेथून अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सही उपलब्ध होणार आहेत. बेंगळुरू हे आयटीसह ईव्ही हब मानले जाते. तेथे ‘महिंद्रा’चा मोठा प्रकल्प असून, त्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. एचएएल, बॉशसारख्या कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरूला आहेत. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाशिकला येणे-जाणे वाढेल. याशिवाय पर्यटन क्षेत्रालाही मोठा हातभार लागणार आहे.
ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’ या एकमेव कंपनीची सेवा सुरू असून, नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या सहा शहरांसाठी सेवा दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच इंदूर व अहमदाबादच्या सेवेत कपात करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर १ मेपासून नवी दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याने नाशिककरांची महत्त्वाची मागणी पूर्ण झाली. या सेवेमुळे नाशिकला उत्तर भारताची थेट कनेक्टिव्हिटी लाभली.
नाशिककरांची दुसरी मागणी बेंगळुरू सेवेची होती. निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तान आदी संघटनांकडून या सेवेसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर ‘इंडिगो’ने सकारात्मक प्रतिसाद देत या सेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. आयटी क्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
SL/ML/SL
16 June 2024