२५ टक्के आरक्षित जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे होणार जाहीर

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क):बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी ) आज ७ जून २०२४ सकाळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) (पुणे) येथे काढण्यात आली. सदर सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी येत्या बुधवार १२ जून रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार जाहीर करण्यात येणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी केले आहे.
तथापि अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदतवाढ ४ जून २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार पालिका क्षेत्रातील एकूण ३३८ पात्र शाळांमध्ये एकूण ६ हजार २६५ जागांवर एकूण ९ हजार ९०२ अर्ज प्राप्त झाले आहेत.