लवकरच सुरू होणार मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन

भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केली. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करता येईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी नुकतेच भावनगर टर्मिनसवर तीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये भावनगर टर्मिनस-अयोध्या कॅन्ट एक्स्प्रेस, रेवा-पुणे एक्स्प्रेस आणि जबलपूर ते रायपूर जोडणारी नवीन ट्रेन समाविष्ट आहे. या कार्यक्रमाने प्रवाशांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी बोलताना त्यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेनविषयी माहिती दिली. बुलेट ट्रेन लवकरच धावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
508 किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पात 12 स्थानके असतील. यात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमतीचा समावेश आहे. या प्रकल्पाची किंमत 1,08,000 कोटी रुपये असून, यापैकी 88,000 कोटी रुपये जपानकडून येणार आहेत.
रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, गुजरात भागातील काम (वापी ते साबरमती) डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल. संपूर्ण प्रकल्प (महाराष्ट्र ते साबरमती) डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने बीईएमएल लिमिटेडला दोन हाय-स्पीड ट्रेनच्या रचनेसाठी कंत्राट दिले आहे. या ट्रेन जपानी तंत्रज्ञानावर आधारित असतील, ज्यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.