येत्या २४ तासांत केरळात दाखल होणार मान्सून

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षीच्या भयंकर उन्हाळ्याने आजवरचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. तीव्र उन्हाच्या झळांनी होरपळून निघालेल्या मानवाला आणि समस्त जीवसृष्टीला आता आस लागून राहीली आहे ती मान्सूनच्या आगमनाची. आणि आता तो चक्क येत्या २४ तासांत केरळमध्ये दाखल होत आहे. गेल्या आठवड्यात अंदमानात दाखल झालेला मान्सून रेमल चक्रीवादळाचा अडथळा यशस्वीपणे परतवत उद्या केरळच्या भूमीवर दाखल होत आहे. IMD ने दिलेल्या या आनंदवार्तेंमुळे शेतकरीवर्गासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ६ जून रोजी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली, उ. प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह देशातील अनेक राज्यात तापमानाने कहर केला आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाने ५० डिग्री सेल्सियसचा आकडा पार केला आहे. यामुळे येत्या २४ तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याच्या बातमीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसात दक्षिण भारतातील राज्यांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे तर येत्या काही आठवड्यात मान्सून मध्य व उत्तर भारतात सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने सांगितले की, मान्सून केरळ किनारपट्टीकडे सरकत आहे. केरळनंतर मान्सून ईशान्येकडील राज्यांकडे सरकेल.
IMD ने लू चा सामना करत असलेल्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. हवामान विभागाने म्हटले की, ३० मे नंतर उष्णतेची लाट कमी होणार असून एक आठवड्यात काही राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर सिक्किम आणि बंगालमध्येही हवामानात बदल होईल. गुरुवारीपासून वातावरणात बदल होऊन येत्या ५ दिवसात पाऊस सुरू होऊ शकतो.
SL/ML/SL
29 May 2024