रौप्यमहोत्सवी वर्षात ‘वंदे भारत’ रेल्वेची मिनीएचर प्रतिकृती

 रौप्यमहोत्सवी वर्षात ‘वंदे भारत’ रेल्वेची मिनीएचर प्रतिकृती

पुणे, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील विविध प्रसिद्ध रेल्वे प्रतिकृतींचे एक अनोखे संग्रहालय असलेल्या ‘जोशीज मिनिएचर रेल्वे म्युझियम’च्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संग्रहालयात लवकरच ‘वंदे भारत’ या भारताच्या पहिल्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रतिकृतीचा समावेश केला जाणार आहे. या रेल्वेच्या प्रतिकृतीचे नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी म्युझियमचे रवी जोशी, त्यांचा मुलगा देवव्रत जोशी, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “ २५ वर्षांपूर्वी साकारलेले हे मिनिएचर रेल्वे म्युझियम मोठे काम असून, हे काम उभारण्यापूर्वी सुमारे २५ वर्षांपासून त्याची तयारी केली गेली असेल. भाऊ जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

विशेष म्हणजे याठिकाणी आज वंदे भारत रेल्वेच्या प्रतिकृतीचे अनावरण होत आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे, कारण आगामी काळ हा वंदे भारत रेल्वे’चा असणार आहे. रवी जोशी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो.’’

या मॉडेल’च्या वैशिष्ट्याबाबत माहिती देताना रवी जोशी म्हणाले, “ म्युझियमच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही वंदे भारत रेल्वेची प्रतिकृती संग्रहालयात समाविष्ट करत आहोत. गेल्या २५ वर्षांत देशभरातील नागरिकांनी या संग्रहालयाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे.’’

वंदे भारत रेल्वेच्या प्रतिकृतीबाबत देवव्रत जोशी म्हणाले, “ या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय रेल्वे विभागाकडून वंदे भारत रेल्वेचे डिझाईन घेऊन, त्यानुसार आम्ही या प्रतिकृतीची रचना केली आहे. याचे प्रमाण साधारण १००:१ असे आहे. अर्थात प्रतिकृतीचा आकारापेक्षा प्रत्यक्ष रेल्वेचा आकार हा १०० पटीने मोठा आहे.

प्रत्यक्ष रेल्वेची रचना, त्यातील एअर सस्पेन्शन, स्ट्रीमलाईन बॉडी, अशा तांत्रिक गोष्टी प्रतिकृतीमध्ये हुबेहूबपणे साकारण्यात आल्या आहेत. या रेल्वेची एक प्रतिकृती साकारण्यासाठी आम्हाला ३ महिन्याचा कालावधी लागला. या रेल्वेच्या वर्किंग मॉडेलवर सध्या काम सुरु असून, हे काम पूर्ण झाल्यावर संग्रहालयात ही रेल्वे प्रतिकृती प्रत्यक्ष धावताना पहायला मिळणार आहे.’’

जोशीज म्युझियम ऑफ मिनीएचर रेल्वेज म्युझियमबाबत :

बालकृष्ण जोशी अर्थात भाऊ जोशी स्केल मॉडेल्स गोळा करण्याच्या या छंदातून तब्बल चाळीस वर्षे देश विदेशातून रेल्वेची स्केल मॉडेल्स संकलित केली होती. परदेशात असलेल्या स्केल मॉडेल या छंदाबाबत भारतीयांना माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी १९८२ साली १८’’ व्यासाच्या भागावर १:८७ या प्रमाणाने एक चलत मॉडेल तयार केले. मुंबई, पुणे या ठिकाणी याची प्रदर्शन केल्यावर त्याला एक स्थायी स्वरूप द्यावे, या उद्देशाने त्यांनी २५ वर्षांपूर्वी म्हणजे १ एप्रिल १९९८ रोजी जोशीज् म्युझियम ऑफ मिनीएचर रेल्वेज साकारले. यामध्ये डीझेल ट्रेन, स्टीम इंजिन (वाफेवरील इंजिन), इलेक्ट्रिक रेल्वे, रेल बस, रोप वे, फिनीक्युलर रेल्वे, टोय ट्रेन अशा विविध प्रकारच्या ७ हून अधिक रेल्वे प्रतिकृती पाहायला मिळतात. या रेल्वेबाबत माहिती सांगणारा २० मिनिटांचा शो उपस्थितांना दाखविला जातो. तब्बल ६० सिग्नल यंत्रणा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

जोशीज म्युझियम ऑफ मिनीएचर रेल्वेजचे संस्थापक भाऊ जोशी यांच्या निधानानंतर त्यांचे सुपुत्र रवी जोशी यांनी या संग्रहालयाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी संग्रहाय उपक्रमासोबतच रेल्वेचे मॉडेल्स बनविण्यावर भर दिला. तसेच भारतीय रेल्वेसाठी काही महत्वपूर्ण प्रकल्प त्यांनी राबविले आहे. ते खालील प्रमाणे :

  •    गोव्यातील मडगाव येथे कोकण रेलेसाठी तर कर्नाटक राज्यातील धारवाड येथे भारतीय रेल्वेसाठी स्टेशन मास्टर यांच्या प्रशिक्षणासाठी मॉडेल रूमची उभारणी.
  •    दिल्ली येथील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयातील मिनिएचर रेल्वे मॉडेल रूम या दालनाची रचना
  •    वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्कशॉप’साठी डिझेल मॉडेल्सची निर्मिती.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *