रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा तोंडावर आल्यामुळे रेल्वे प्रशासन रेल्वे रुळ तसेच सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि देखभालीसाठी युद्धपातळीवर काम करत आहे. मागील आठवड्यात यासाठी तब्बल ३ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. आता उद्याच्या रवीवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यादिवशी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप – डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा,परळ,दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर वळविण्यात येणार आहेत.घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर,परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर- ११. १० ते ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.मात्र ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.
त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप – डाऊन जलद मार्गावर, सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय काही लोकल सेवा दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
SL/ML/SL
8 June 2024