राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल , फडणवीस दिल्लीत, तावडेंकडे सूत्रे

 राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल , फडणवीस दिल्लीत, तावडेंकडे सूत्रे

मुंबई, दि. ६ ( मिलिंद लिमये ) : लोकसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे नुकसान झाल्यानंतर भाजपाने आपले राज्याच्या राजकारणातील डावपेच आखण्यास सुरूवात केली असून त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात नेऊन विनोद तावडे यांच्या हातात राज्य भाजपची सूत्रे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यात गेल्या पाच वर्षांत सत्ताकारणात प्रचंड उलथापालथ झाली, एकत्रित लढलेल्या शिवसेना – भाजपात बेदिली माजून शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस , राष्ट्रवादी सोबत वेगळी चूल मांडली आणि हातातोंडाशी आलेली सत्ता भाजपाच्या हातून निसटली आणि इथेच सुडाच्या राजकारणाचा जन्म झाला. मोदी आणि विशेषतः अमित शहा यांनी त्याच वेळी शिवसेनेला धडा शिकविण्याचा घाट घातला. तो अंमलात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कामाला लावले , येनकेन प्रकारेण ठाकरे यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न फडणवीस यांनी सुरू केले , विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी ठाकरेंची अनेक प्रकरणे बाहेर काढली.

यातून महा विकास आघाडी सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शेवटी एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवून गळाला लावण्यात आले. उध्दव ठाकरे यांच्या बेफिकिरी वागणुकीमुळे आणि त्यांनी केलेल्या संपूर्ण दुर्लक्षामुळे या बंडाला चांगलीच हवा मिळाली आणि परिणामी ठाकरे यांची सत्ता उलथवून पाडण्यात आली. त्यासोबतच त्यांचा पक्ष आणि निवडणूक चिन्हं देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आले.

हे कमी पडले म्हणून की काय शरद पवारांच्या कथित हुलकावणी देणाऱ्या राजकारणाने त्यांनाच धडा शिकविण्याचा घाट दिल्लीश्वरानी घातला आणि अजित पवार यांच्या सारखा महत्त्वाकांक्षी नेता हाताशी धरून तोही पक्ष फोडण्यात आला, त्याही पक्षाची सूत्रे आणि निवडणूक चिन्हं शरद पवारांच्या कडून काढून घेण्यात आले. पुन्हा हे सगळं आपण अद्दल घडविण्यासाठी केले असेही पत्रकार परिषदेत फडणवीसांनी जाहीर ही करून टाकले.

या सगळ्याचा परिणाम राज्यातील मतदारांवर झाला , त्यांना हे सगळे अजिबात आवडले नाही उलट भाजपचा समर्थक मतदार ही भाजपा पासून यामुळे तुटला . त्यांनाही हा प्रकार अजिबात आवडला नव्हता . यातच मराठा आरक्षण आंदोलन , संविधान बदलाचा विरोधकांचा प्रचार यामुळे भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला . अनेक जाणकारांनी ही भाजपचे इतके अपयश गृहीत धरले नव्हते.

आता या सगळ्याचे खापर फोडलं जाणे अपेक्षित होतेच , त्यानुसार काही वेगळे व्हायच्या आधीच फडणवीसांनी राजीनाम्याची तयारी दर्शवत राज्याची सूत्रे पुन्हा ताब्यात घेण्याची हालचाल सुरू केली आहे. मात्र आता पुन्हा फडणवीसांना राज्याची सूत्रे मिळण्याची शक्यता जवळपास मावळली असून त्यांना दिल्लीच्या राजकारणात सामावून घेत त्यांना एखादे बरे खाते देऊन त्यांचे तिथे पुनर्वसन केले जाईल आणि त्यांच्या जागी इतके वर्ष अज्ञातवासात काढणारे विनोद तावडे यांना राज्याच्या राजकारणाची पक्षाची सूत्रे दिली जाण्याच्या हालचाली भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सुरू केल्या आहेत.

ML/ML/SL

6 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *