डहाणूतील बोर्डीमध्ये चिकू महोत्सवाचे आयोजन
डहाणू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणूचा परिसर अप्रतिम गुणवत्तेच्या चिकूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मोठा आकार आणि मधुर चव यांमुळे इथले चिकू देशभर प्रसिद्ध आहेत. डहाणू आणि परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या आदिवासींसाठी चिकू उत्पादनामुळे रोजगाराचे चांगले साधन निर्माण झाले आहे. चिकूवर प्रक्रीयाकरून येथे अनेक पदार्थही तयार केले जातात. या चिकूंच्या विक्रीस आणि त्यायोगे पर्यटनास चालना मिळावी म्हणून दरवर्षी येथे चिकू महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील बोर्डी येथे ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
रूरल आंत्रप्रूनर्स वेल्फेअर फाउंडेशनच्या (आरईडब्लूएफ)वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे .यावर्षीच्या महोत्सवात आयोजकांनी काही नवीन उपक्रमांचा समावेश केला असून पर्यटकांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी खात्री आयोजकांना आहे.शेती, ग्रामीण उद्योजकता व समृद्ध ग्रामीण संस्कृती यांचा पर्यटनाबरोबर मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्था सबल करणे व त्यासोबतच् ग्रामीण जीवनाला सन्मान प्राप्त करून देणे या उद्देशाने २०१३ मध्ये चिकू महोत्सवाचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यातील वाढत्या पर्यटनाला दिशा देऊन अनुभव देणारे पर्यटनस्थळ म्हणून ओळख देण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे दोन दिवसात लाखभर पर्यटक या कार्यक्रमाला भेट देतात.यावर्षी पर्यटक चिकू महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
SL/ML/SL
4 Feb. 2025