मत्स्योत्पादन मंत्री नितेश राणे मच्छीमार बांधवांच्या हिताबद्दल काहीही बोलत नाही
मिल्टन चौधरी
मुंबई, दि ५
पर्ससीन मासेमारीला मत्स्यखात्यातील भ्रष्ट अधिकारी अभय देत असल्याने सरकारी तिजोरीची बेमालुमपणे लूट सुरू असल्याचा आरोप करीत पर्ससीन, एलईडी मासेमारीची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी ‘पारंपरिक मच्छिमार संरक्षण समिती’ने केली आहे. ‘एकेकाळी पर्ससीन बोटीवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ‘बांगडा फेक’ आंदोलन करणारे कोकणचे आमदार नितेश राणे मत्स्यमंत्री झाल्यानंतर पारंपरिक मच्छिमारांच्या हिताबाबत काहीही बोलत नाहीत, अशी खंत ही समितीचे समन्वयक मिल्टन सौदीया यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत व्यक्त केली.
बेकायदा मासेमारीवर लक्ष ठेववण्यासाठी जानेवारीपासून ड्रोन यंत्रणेचा वापर केला जातो. ही यंत्रणा अवैध मासेमारी रोखण्यात अपयशी आहे. गस्ती नोका आणि ड्रोनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. प्रत्येक बंदरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तरी पर्ससीन,एलईडी बोटी मासळी उतरवताना दिसून येतील. मात्र याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचे ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष जयवंत तांडेल यांनी सांगितले.
मुंबईतील कोळीवाड्यांवर मोठ्या बिल्डरांचा डोळा आहे. निवडणूक आली की कोळीवाड्यांच्या पुनर्वसनाचा विषय निवडणूक अजेंडावर आणला जातो. अनेक वर्ष झाली तरी अद्याप आमचा सातबारा आमच्या नावावर केला गेला नसल्याचा आरोप अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी यावेळी केला.
आज जागतिक महिला मच्छिमार दिन आहे. मात्र आमच्या मच्छिमार महिला दुर्लक्षित असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते.KK/ML/MS