आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च
नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने तापलेले डांबरी रस्ते… भेगालळेल्या टाचा अन त्यावर डांबराचे बसणारे चटके… डोक्याला उन लागू नये म्हणुन बांधलेले मुंडासे.. तर महिलांनी डोक्यावर घेतलेला पदर… पण मनाशी सातबाऱ्यावर वन जमिनी लागल्या पाहिजे यासाठी नाशिकहुन विधानभवनाला घेराव घालण्यासाठी तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने दिंडोरी नाका येथे कांदा, वागे, कोथंबिर रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त करीत मोर्चाने मुंबईकडे कूच केली.
भारताचा कम्युनिष्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने नाशिक येथून काल पासून माजी आमदार जे. पी. गावीत, डाँ. अजित नवले, डाॅ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकरी बांधवाचा मोर्चाला सुरवात झाली.
मोर्चामध्ये डोक्यावर लाल टोपी, हातात लाल झेंडा आणि खिशाला बिल्ला लावून महिला पुरुष केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत, तसेच आमच्या मागण्या मान्य करा या घोषणा देत होते. म्हसरुळ पासून मोर्चाला सुरुवात झाली त्यावेळी रस्त्याची एक बाजू पुर्णपणे बंद करावी लागली होती.
मोर्चांची लांबी ही एक ते दिड किलोमीटर असल्याने तोपर्यंत वाहतुक विस्कळीत झाल्याचे दिसून येत होते.मोर्चेकरी दिंडोरी नाका येथे आले तेव्हा संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी कांदे, वागे, कोथंबिर, टोमँटोला दर मिळत नाही, म्हणुन रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.
दिंडोरी नाका येथे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेवून मोर्चा थांबविण्याबाबत विंनती केली, तसेच यावेळी माजी आमदार जे पी गावीत यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून दिला असता, पालकमंत्री भुसे यांनी मोर्चेकऱ्यांच्या १५ जणांच्या समितीला आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्वाच्या मंत्र्यासोबत चर्चासाठी निमंत्रण दिले आहे.Long march of tribal farmers from Nashik to Mumbai
गावीत यांनी आज बैठकीला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले, परंतू मोर्चा हा सुरुच रहाणार असल्याचे सांगितले. मोर्चा हा आडगाव नाका मार्गे द्वारका, मुंबई नाका, पाथर्डी फाटा मार्गे विल्होळी, आंबेबहुला येथे मुक्काम करुन आज मोर्च्याने मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आज सकाळी पुन्हा विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहे.
दरम्यान निमाणी परिसर, जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, इंदिरा नगर, राणेनगर आणि पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता.
ML/KA/PGB
14 Mar. 2023