लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा

 लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ आणि विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली, यावेळी सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, आघाडीचे राजकारण सोपे नसते पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन महाविकास आघाडी मजबूत केली आणि निवडणुकीला सामोरे गेलो. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केले आणि जनतेनेही काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत कौल दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ जाहीर सभा घेतल्या, मंगळसुत्र, हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे पुढे करत विभाजनकारी राजकारण केले पण जनता यावेळी मोदींच्या अपप्रचाराला बळ पडली नाही.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून टाकले आणि जनतेत मोठा आत्मविश्वास निर्माण केला. देशाची लोकशाही तसेच संविधान वाचवण्याच्या लढाईत तानाशाही सरकार विरोधात ते खंबीरपणे लढले . जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहिली, राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवला. कार्यकर्त्यांची मेहनत , मजबूत संघटन, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे काँग्रेस पक्षाने मोठा विजय संपादित केला आहे.

काँग्रेसच्या या विजयात सर्व जाती धर्मांच्या लोकांचे समर्थन आहे. काँग्रेस पक्षावर जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे नाना पटोले म्हणाले

ML/ML/PGB
7 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *