विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

 विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० यावेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनाद्वारे संस्मरण यावेळी करण्यात येईल.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री श्री. दिपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विरोधी पक्षनेते श्री. अजित पवार आणि श्री. अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनुश्री फडणीस या करणार असून कार्यक्रमाची संहिता श्रीमती उत्तरा मोने यांनी तयार केली आहे. मराठी भाषेची, मराठी साहित्याची उंची वाढविणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे अभिवाचन या कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीश ओक, लीना भागवत हे करतील. नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि अभिषेक नलावडे हे याप्रसंगी कविता गायन करतील. विधानमंडळातील या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मिती क्रिएशन्स सांभाळत आहे. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, पत्रकार, साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत आणि मराठी भाषा समितीचे उप सचिव श्री. विलास आठवले यांनी केले आहे.Literary tour on Marathi Language Day at Vidhan Bhavan

ML/KA/PGB
24 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *