नेहमी कोकणाला सापत्न वागणूक का ? वायनरी उद्योगाची शोकांतिका

 नेहमी कोकणाला सापत्न वागणूक का ? वायनरी उद्योगाची शोकांतिका

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वीस वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष वायनरी परवानगी, शून्य एक्ससाइज, टॅक्स ,सर्व सवलती पण अजून कोकणात वायनरी परवानगी सहजासहजी मिळत नाही.आणि आता 20 टक्के वॅट.

गेली 75 वर्ष सरकारी बदलली पक्ष बदलले पण महाराष्ट्र शासनाचे एक धोरण सातत्यपूर्ण !
कोकणात स्थानिक लोकांचे कोणतेही उद्योग विकसित होऊ द्यायचे नाहीत !
मी पुराव्यासहित वस्तुस्थिती मांडणार आहे ! यातली पहिली स्टोरी आज !
ही एका उद्योगाची स्थिती नाही अशी जवळपास सर्व निसर्ग पूरक उद्योगांची कोकणात स्थिती आहे.

कोकणावर अजून एक मोठा अन्याय एक खूप गंभीर विषय मी आज मांडणार आहे. हा लेख कोणीतरी दिलेल्या माहितीच्या आधारावर नाही तर मी गेली पंधरा-वीस वर्ष या विषयासाठी काम करतोय आणि प्रत्यक्ष अनुभव आपल्याबरोबर शेअर करतो.

फळांवर प्रक्रिया करून वाईन बनवली जाते. हे युरोपमध्ये हेल्थ ड्रिंक आहे आणि घराघरात पितात. ही एक मोठी आंतरराष्ट्रीय इंडस्ट्री आहे.

महाराष्ट्रात सुदैवाने वीस पंचवीस वर्षांपूर्वी वाईनरी सुरू कराव्यात अशा स्वरूपाचा विचार आला. साहजिकच 

द्राक्षापासून मोठ्या प्रमाणात वाईन केली जाते म्हणून द्राक्ष वाल्यांचा पहिला विचार झाला. यासाठी वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं याला शून्य टक्के एक्साइज टॅक्स. ही सवलत दिली यामुळे विशेषता पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष पासून वायनरी सुरू झाल्या. सुलावाइन ही आपली मोठी सक्सेस स्टोरी आहे.

कोकणात द्राक्ष नाहीत हे मान्य पण कोकणात जांभळे करवंदे काजू हापूस आंबा अननस अशी लाखो टन फळे पिकतात आणि प्रक्रिये अभावी त्यांचा नाश होतो. त्यामुळे कोकणात फळांपासून वाईन बनवण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक होते. पण कोकणातल्या फळांपासून कोकणात वायनरी सुरू केली तर त्याला 100% एक्साईज टॅक्स लावण्यात आला. आणि त्यामुळे कोकणात वायनरी उद्योग करताच येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. 

 वीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने जांभळापासून वाईन बनवली, पण दहा वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्याला परवानगी मिळाली नाही. त्यांनी बनवलेली 20, 000 लिटर वाइन फुकट गेली, कोकणात जाऊन प्रत्यक्ष काम करणाऱ्या असंख्य तरुणांचे फ्रस्ट्रेशन मी प्रत्यक्ष पाहतो आणि त्यावेळी खूप अस्वस्थ व्हायला होते.

त्याच्याबरोबर मी सुद्धा ही परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो त्याला मदत करत होतो. शासकीय अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर अडवणूक केली परवानगी शेवटपर्यंत दिली नाही.

 गेल्या वीस वर्षात कोकणात एकही वायनरी विकसित झाली नाही याउलट पश्चिम महाराष्ट्रात शेकडो वायनरी उभ्या राहिल्या. मागच्या काळात विशेषता देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी या विषयात काही चांगले निर्णय घेतले, आणि त्यामुळे कोकणातील शंभर टक्के एक्साइज टॅक्स बंद करण्यात आला आणि एका लिटरला एक रुपया एक्साईज टॅक्स अशी खूप चांगली सवलत दिली. कोकणात छोट्या वाइनरी हव्यात आणि त्याची जोड पर्यटनाला दिली तर इटली आणि फ्रान्स सारखे वायनरी टुरिझम आपल्याला विकसित करता येईल आणि याचा आंतरराष्ट्रीय पर्यटक कोकणात आणण्यासाठी खूप मदत होईल. 

   या दृष्टीने आम्ही अनेक प्रशिक्षण कार्यक्रम केले आणि अशा वायनरी सुरू करण्याकरता समन्वय सुरू केला. पण गेली दहा वर्ष अण्णा महाजन हे आमचे या विषयातील कार्यकर्ते छोट्या वाइनरीला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत सुदैवाने त्यांना पहिली परवानगी गेल्या वर्षी मिळाली. अजूनही संपूर्ण परवानगी मिळालेली नाही. पण लवकरच त्यांची वायनरी सुरू होईल आणि कोकणातील छोटी वाइनरी आणि त्याबरोबर पर्यटन हा विषय आपण कोकणात सुरू करू. 

क्रमशः

आता आपल्या मुख्य स्टोरी ला आपण सुरुवात करू.
प्रियंका सावे ही कोकणातील एक तरुणी अमेरिकेतील आपलं करिअर सोडून भारतात आली. आपला वडिलांचा पर्यटनाचा व्यवसाय हिलझिल रिसॉर्ट डहाणू त्यांना मदत करताना तिने कोकणातली पहिली वायनरी सुरू केली.
पहिल्यांदा कोकणात मोठ्या प्रमाणात वाईन निर्मिती प्रियांकाने सुरू केली. यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाले.
हजारो टन हापूस आंबा पायनापल पालघर मधला चिकू मध यापासून ती वाईन निर्माण करते. यामुळे या फळांची बाजारपेठ नक्की निर्माण झाली.

  आज प्रियांका वाइन या विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ञ आहे हिमाचल प्रदेश सरकारने तिला बोलऊन घेतलं जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या राज्यात सफरचंद आणि अन्य फळांपासून वाईन बनवण्याकरता कारखाना काढण्यासाठी सगळी मदत केली. मेघालय या राज्याने आपल्या राज्यात वाइनरी उद्योजक बनावेत याकरता ब्रँड अँबेसिडर म्हणून आणि मास्टर ट्रेनर म्हणून प्रियंका सावे यांची निवड केली. 

 ही कोकणची सुकन्या महाराष्ट्रात मंत्रालयात किमान शंभर वेळा गेली असेल, असंख्य अडचणी आणि अडथळे पार पाडून तिने कोकणातील सर्वात मोठी वायनरी उभी केली. फ्रुझांते नावाचा वाइनरी ब्रँड विकसित केला. जो आज जगभर प्रसिद्ध आहे. कोकणात शंभर टक्के एक्साइज लावली जाते हे बंद व्हावे यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पण सर्वाधिक प्रयत्न प्रियंका सावे हिने केले. हा टॅक्स रद्द झाला त्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो.

 आता राहिला महत्त्वाचा भाग ही कोकणची कन्या महाराष्ट्रातील शासनाला आणि प्रशासनाला वैतागली आहे आणि तिने कोकणातून तिची वायनरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका बाजूला जगभरातून महाराष्ट्रात उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणारे राज्यकर्ते कोकणात ग्रामीण भागात तरुण अशा स्वरूपाची धडपड करतात त्यांचे उद्योग बंद होतील अशा स्वरूपाची धोरणे बनवली जातात.

कारण

 प्रत्येक ठिकाणी अडवणूक, पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि द्राक्षासाठी VAT नाही, सुरुवातीपासून सर्व सवलती, शून्य एक्ससाइज आणि आता द्राक्ष सोडून इतर फळांची जी वाईन बनेल जी कोकणात बनेल जी कोकणात बनते तिला 20 टक्के वॅट आकारण्यात येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला न्याय देणारी ही इंडस्ट्री कोकणातून कायमची हद्दपार होणार आहे. केवळ टॅक्स नाही एक कोटी रुपयांचा दंड या कोकणातील पहिल्या वाइनरीला प्रियांका सावे हिच्या उद्योगाला शासनाने लावला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातल्या अन्य भागातील वायनरीना सर्व प्रकारची मदत करण्याचे धोरण आहे आणि ती चांगली गोष्ट आहे.

 या विरोधात फक्त निवेदन नाही पण मोठे आंदोलन करायचे आम्ही ठरवले आहे आणि केवळ हाच विषय नाही अशा अनेक विषयांमध्ये हाच अनुभव विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोकणात वर्षानुवर्ष येत आहे. महाराष्ट्रातील इतर प्रदेशांना वेगळा न्या य तिथे साखर उद्योग उभा राहावा उसाचा उद्योग उभार हवा, कापसाला हमीभाव मिळावा आणि अन्य उद्योग उभे राहावे म्हणून सर्व प्रकारच्या सबसिडी सवलती परवानग्या दिला जातात यावर आमचा आक्षेप नाही हे ग्रामीण विकासासाठी करायला हवे 

पण कोकणात वेगळा न्याय का ?

कोकणात कोणताच निसर्ग पूरक उद्योग उभा राहू नये यासाठी सातत्याने अडचणी निर्माण करणे हे धोरण आता बंद व्हायला पाहिजे आणि यासाठी एक प्रदीर्घ लढा आणि आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

कोकण प्रदेशाला कोकणातील उद्योजकांना इथल्या धडपडणाऱ्या तरुणांना कसा त्रास दिला जातो आणि त्यांचे उद्योग बंद पडतील याकरता कसे प्रयत्न केले जातात यावर एक स्वतंत्र लेखमाला मी लिहितोय वेगवेगळ्या कोकणातील निसर्ग पूरक उद्योगांची स्थिती आणि त्यांना होणारा त्रास हा मी लिहिणार आहे आणि केवळ लिहिणार नाही या सर्व विषयात कोकणातील उद्योजकांना सोबत घेऊन एक प्रदीर्घ संघर्ष सुरू करत आहोत ,!

होय आमची सहन करण्याची क्षमता संपली आहे, आणि त्यामुळे कोकणावर अन्याय होणाऱ्या विषयांमध्ये आता संघर्ष करावाच लागणार आहे !

संजय यादवराव
कोकण चेंबर ऑफ कॉमर्स
ग्लोबल कोकण

ML/ML/PGB 1 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *