केजरीवालांच्या जामीनाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आज दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अवघ्या २४ तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले आहे. दिल्ली सरकारच्या रद्द झालेल्या अबकारी धोरणातून मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अरविंद केजरीवाल आरोपी असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीस सुधीर कुमार जैन आणि रवींद्र दुडेजा यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. “उच्च न्यायालय या प्रकरणाची दखल घेईपर्यंत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी होईपर्यंत सत्र न्यायालयासमोर (राऊस एव्हेन्यू) आता या प्रकरणाची सुनावणी होणार नाही”, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
गुरुवारी सायंकाळी (२० जून) राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे न्यायाधीश न्याय बिंदू यांनी केजरीवाल यांचा जामीनाचा अर्ज मंजूर करत ईडीची ४८ तास थांबण्याची मागणी फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता एसव्ही राजू यांनी सांगितले की, सत्र न्यायालयात ईडीला आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळाली नाही. सत्र न्यायालयाचा निकाल अद्याप संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला नाही. त्यात कोणत्या अटी टाकल्यात हे माहीत नाही. जामिनाला विरोध करण्यासाठी आम्हाला पुरेशी संधी मिळाली नाही.
SL/ML/SL
21 June 2024