कथक नृत्याद्वारे मांडला ‘अनादी-अनंत, श्री गणेशाचा’ महिमा

 कथक नृत्याद्वारे मांडला ‘अनादी-अनंत, श्री गणेशाचा’ महिमा

पुणे , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तबला, मृदंग, बासरी, पेटीच्या सुश्राव्य ध्वनी सह गणरायाची स्तुती करणा-या शब्दसुमनांच्या साथीने नृत्यांगनांनी कथक मधून गणरायाला नमन केले. महाराष्ट्रातील अष्टविनायक क्षेत्रांचे महत्व आणि पौराणिक कथांचे नृत्याद्वारे सादरीकरण करून अनादी अनंत असलेल्या ओंकार स्वरूपी गणरायाची महती पुणेकरांसमोर सादर झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रख्यात कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस व सहका-यांनी ‘अनादी-अनंत, श्री गणेश’ हा कार्यक्रम सादर केला. शेंदूर लाल चढायो… जयदेव जयदेव विद्या सुखदाता… या रचनेवरील नृत्याद्वारे गणरायाला आळवणी करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विश्वनिर्मिती पूर्वी सर्वात पहिला तयार झालेला ध्वनी तो ओंकार. त्यामुळे ओंकार हा अनादी आहे आणि त्या ओंकाराच्या सगुण रुपाला श्रीगणेश म्हणून ओळखतो. त्याचा गणेशाच्या लिला व महिमा उपस्थितांसमोर नृत्याद्वारे मांडण्यात आल्या. कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला वंदन करीत ‘सिंदूर वदन…’ या रचनेवर आधारित नृत्य शर्वरी जमेनीस यांनी सादर केले. विविध नृत्यरचनांद्वारे काव्य, तराणा, नृत्य आणि पखवाझाचे बोल याची एकत्रित अनुभूती रसिकांना पाहायला मिळाली. चतरंग या ललित कलांच्या एकत्रित रचनेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची… यावर झालेल्या अप्रतिम कथक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. संगीत महोत्सव ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *