श्री कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवच काढले , मूळ मूर्ती प्रकट…
पुणे दि ३० : ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार, दि.१५ डिसेंबर पासून प्रारंभ झाला होता. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्ती चा कालावधी थेट १५ व्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागासह संबंधित विभागांकडून त्यासंबंधी सविस्तर अहवाल मिळाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल.
श्री जयति गजानन मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. चतुर्भुज पैकी एक डावा हात अभय मुद्रेत, एक उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या डाव्या हातात मोदक आणि मोदकावर सोंड ठेवलेली आढळून येते. उजव्या बाजूला खालच्या बाजूस मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीची अर्ध पद्मसनाची बैठक आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत. साधारण ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढल्यावर ही मूळ मूर्ती समोर आली आहे. तसेच मूर्तीचे तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभारा यानिमित्ताने बघता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रीं च्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत होते. ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक झाले होते. याकरिता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया करण्यात आली.
शेंदूर कवच काढण्याकरीता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती. शेंदूर कवच काढणे व त्याअनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया साधारण दोन आठवड्यात पार पडली. आता यानिमित्ताने शिवपूर्वकालातील ऐतिहासिक मूळ मूर्तीचे दर्शन घेण्याचे भाग्य गणेशभक्तांना लाभणार आहे.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती च्या या मूळ स्वरूपातील मूर्तीचे पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळा विधी दि.२९ डिसेंबर रोजी संपन्न झाला. मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांच्या सह
मान्यवरांच्या शुभहस्ते पुर्नप्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न झाला. वेदशास्त्रसंपन्न कल्याण कानडे गुरुजी आणि सहकारी यांनी पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने केले. यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच समस्त ठकार वहिवाटदार पुजारी यांच्या उपस्थितीत पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. पुणेकरांच्या मंगल कल्याणार्थ पूजेमध्ये संकल्प देखील करण्यात आला.
पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये सनई वादन, अथर्वशीर्ष पठण, ढोल ताशा वादन, कीर्तन महोत्सव यांचे नियोजन करण्यात आले आहे. सदर सर्व कार्यक्रमांना गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ML/ML/MS