सुरू झाली जोतिबा यात्रा

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथं दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं सम्पन्न होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
आज पहाटे तीन वाजता महाघंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी संपन्न झाले. पहाटे पाच वाजता शासकीय महाभिषेकासह धार्मिक विधींना सुरुवात झाली.यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधण्यात आली.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातहून लाखो भाविक जोतिबाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत.
मानाच्या सासनकाठ्याही जोतिबा डोंगरावर आलेल्या असून वाडी रत्नागिरी भाविकांच्या गर्दीनं गजबजलं आहे.
आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचं काळभैरव मंदिरासमोर पूजन होणार आहे.श्री जोतिबा हे बद्रिकेदारचं रूप असून ब्रह्मा, विष्णू , महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच केदारनाथ म्हणजेच जोतिबा होय!
जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे. वायू ,पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचं शक्तीदैवत म्हणजे जोतिबा होय.जोतिबा देव दख्खन केदार, सौदागर, रवळनाथ या नावानंही ओळखला जातो.
देवाचा मुख्य पालखी सोहळा आज सायंकाळी साडेपाच वाजता होणार असला तरी आदल्या दिवशीही लाखो भाविकांनी जोतिबाचं दर्शन घेतलं.
सायंकाळी तोफेच्या सलामीनंतर देवाचा छबिना लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीसाठी बाहेर पडणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं प्रशासन तसंच पोलीस बंदोबस्तासह शासकीय यंत्रणा सतर्क आहे.
ML/KA/SL
5 April 2023