जानेवारीत सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा

 जानेवारीत सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत सर्वसामान्यांना किरकोळ महागाईतून (Retail Inflation) मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई (Retail Inflation) गेल्या महिन्यात 4.06 टक्क्यांवर होती. या आकडेवारीनुसार प्रामुख्याने भाजीपाल्याच्या किंमतीतील घसरणीमुळे महागाईपासून दिलासा मिळाला. डिसेंबर 2020 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई दर 4.59 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत अन्नधान्य चलनवाढीचा दर 1.89 टक्के होता. हा आकडा डिसेंबरमधील 3.41 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारीत खुपच खाली आला.
महागाई दर नियंत्रणात आल्यामुळे आगामी काळात व्याजदरामध्ये आणखी कपात होण्याची शक्यता वाढली आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आपले चलनविषयक धोरण ठरविताना किरकोळ महागाई दर विचारात घेते. सरकारने महागाई दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान मर्यादित ठेवण्याचे उद्दीष्ट आरबीआयला दिले आहे.

आयआयपीमध्ये एक टक्का वाढ

डिसेंबर 2020 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात एक टक्का वाढ झाल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2020 मध्ये उत्पादन क्षेत्रात 1.6 टक्के वाढ नोंदवली गेली. त्याच वेळी, वीज क्षेत्रातील उत्पादनात 5.1 टक्के वाढ नोंदवली गेली. मात्र खाण क्षेत्राच्या उत्पादनात 4.8 टक्क्यांची घट नोंदवली गेली. वार्षिक तुलनेने पाहिले तर 2019 च्या डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 0.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती.
PL/KA/PL/13 FEB 2021

mmc

Related post