2 कोटी रुपये किंमत असलेला गणपती बाप्पा ठरतोय चर्चेचा विषय…

जालना दि ३१:– जालन्यात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे बसवण्यात आलेला 108 किलो चांदीचा गणपती बाप्पा चर्चेचा विषय ठरतोय. श्री अनोखा गणेश मंडळाने यंदा 108 किलो वजनी चांदीचा आणि त्याला सोन्याचा मुलामा असलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलीय. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती प्राप्त जालना शहरातील श्री अनोखा गणेश मंडळ दरवर्षी आपल्या नवनवीन संकल्पनानुसार बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. दरवेळी विविध आकर्षक गणपतीची मूर्ती आणि सजीव देखाव्यांमुळे हे सार्वजनिक गणेश मंडळ सातत्याने चर्चेत असते.
अशातच या गणेश मंडळाने यंदा 108 किलो वजनाचा चांदीच्या गणपती बाप्पाची स्थापना केलीय. या गणपतीला सोन्याचा मुलामा असून मूर्तीची किंमत तब्बल 2 कोटी रुपयांच्या घरात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील चांदीचे व्यापारी विश्वकर्मा जांगड यांनी तयार केलेल्या या गणेश मूर्तीच्या दिमतीला 4 ते 5 सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. जे 24 तास मूर्तीवर लक्ष ठेवण्यासाठी खडा पहारा देताहेत. दरम्यान, हा चांदीचा गणपती पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असून लाडक्या बाप्पाची ही मनमोहक मूर्ती जालनेकरांचे लक्ष वेधून घेतेय.ML/ML/MS