जागतिक वारसा दिन

 जागतिक वारसा दिन

मुंबई, दि. 20 (जाई वैशंपायन) :दरवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना’ म्हणजेच युनेस्कोने १९८३ मध्ये हा दिवस जगभर साजरा करायला मान्यता दिली. या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके दिन’ असेही म्हटले जाते. वारशाच्या जपणुकीसाठी सरकारांनी काम करावेच, परंतु ‘ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी जागरूक असणे हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे सामाजिक उत्तरदायित्व आहे’, हे त्यानिमित्ताने अधोरेखित केले जाते.

मानवी अस्तित्वाचे निरनिराळे अर्थ उलगडून बघताना, इतिहासाचा मागोवा आणि संस्कृतीचा अभ्यास आवश्यक ठरतो. मानवाला वर्तमानात जगतानाच भविष्याचा वेध घेण्याची जशी ऊर्मी असते तशीच, भूतकाळात डोकावण्याची ओढही असते. काळाच्या ओघात भक्कमपणे उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळेच इतिहासाची, पिढ्यापिढ्यांनी केलेल्या विकासाची आणि ऱ्हासाचीही कहाणी सांगू शकतात. अशा ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणारे पूर्वज एका अर्थी, आपल्याला दिशा दाखविण्याचेच काम करीत असतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अशाप्रकारे मानवी इतिहास आणि संस्कृती सांगणाऱ्या स्थळांकडून पिढ्यानुपिढयांना चिरंतन प्रेरणा मिळत राहते. कलात्मक वास्तूंकडून सौंदर्यदृष्टी मिळत राहते. म्हणूनच मानवाच्या राजकीय/ सांस्कृतिक/ आर्थिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या स्थळांना वारसा किंवा संचित म्हणून जपून, त्यांच्या जतन-संवर्धनाचे दायित्व सांभाळले जाते.

अशा ठिकाणी पर्यटनाला चालना मिळून आर्थिक विकासाला हातभार लागतो. त्या स्थळाच्या संवर्धन आणि विकासासाठी देशविदेशातील संस्थांकडून निधी उभा राहण्यास मदत होते. ज्या मान्यताप्राप्त स्थळांना धोका निर्माण झाला आहे, अशांची वेगळी सूची सांभाळली जाते. मग त्यांना पुन्हा जपण्याचे प्रयत्न करून त्यांच्यावरील गंडांतर टळले की त्यांना त्या धोकाग्रस्त सूचीतून बाहेरही काढले जाते.

यावर्षीच्या वारसा दिनाची मध्यवर्ती संकल्पना समजून घेण्यापूर्वी ‘वारसा’ संकल्पनेत काय काय सामावलेले आहे, ते पाहू. नैसर्गिकदृष्टया वैशिष्ट्यपूर्ण स्थान, ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक रीतिरिवाज, परंपरा, प्राचीन अवशेष अशा साऱ्या गोष्टींना जागतिक संचिताचा भाग म्हणून मान्यता मिळू शकते. मानवाच्या उत्पत्तीपासूनचा प्रवास सांगण्यात योगदान देणारे त्यांचे सांस्कृतिक मूल्य हीच त्यांची ओळख असल्याने, त्यांची जपणूक हे केवळ संबंधित प्रदेशाचे नव्हे, तर अखिल मानवजातीचे कर्तव्य ठरते. म्हणूनच युनेस्को अशा गोष्टींचा समावेश जागतिक वारसा सूचीत करते, अर्थात त्यासाठी काही ठराविक प्रक्रिया पार पाडावी लागते. उदा.- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य इतिहासातील काही घटनांशी संबंधित १२ गडकिल्ले जागतिक वारसा सूचीसाठी भारताने सुचवले आहेत. त्यांच्या बाबतीत ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते सर्व/ त्यापैकी काही गड सूचीत समाविष्ट होतील.

मान्यताप्राप्त वारसा स्थळांचे- सांस्कृतिक आणि नैसर्गिक असे दोन प्रकार पडतात. या वर्गीकरणानुसार छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असणारा किल्ले रायगड, मानवाच्या कलात्मक वाटचालीच्या खाणाखुणा मिरविणारी अजंठा आणि वेरूळ लेणी, स्थापत्य
कौशल्याने आपल्याला थक्क करणारे खिद्रापूरचे शिवमंदिर अशी अनेक उदाहरणे सांस्कृतिक वारसा वास्तूंमध्ये मानाच्या स्थानांवर आहेत. तर, ठराविक प्राण्यांच्या संवर्धनासाठी संरक्षित ठेवलेली वनक्षेत्रे नैसर्गिक वारसा म्हणून गणली जाऊ शकतात. आतापर्यंत भारतातील ४२ स्थळांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे.

आता पुन्हा एकदा यावर्षीच्या मध्यवर्ती संकल्पनेकडे वळू.

वारसा दिनाची उद्गात्री संस्था असणाऱ्या ‘इकोमॉस’
(International Council on Monuments and Sites) ने, यंदा ‘व्हेनिस सनदीच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक आपत्ती आणि संघर्ष’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित केली आहे. अस्मानी सुलतानी संकटे कोसळतात, तेव्हा स्वाभाविकपणे सांस्कृतिक संचित धोक्यात येते. पूर, भूकंप, वादळ, भूस्खलन अशा आपत्तीमुळे वास्तू जमीनदोस्त होऊन अनेक पिढ्यांचा इतिहास आणि त्याबरोबर त्या प्रदेशाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख काळाच्या उदरात गडप होते. तर एखाद्या ठिकाणची संस्कृती, इतिहास गिळंकृत करणे, तेथील मानवसमूहांना कणाहीन करणे याच उद्देशाने आक्रमणे/ युद्धे/ संघर्ष घडवून आणले जातात. भारतातील नालंदा-तक्षशिला-विक्रमशिला विद्यापीठे, सोमनाथ मंदिर, काशी-अयोध्या इतकेच काय अगदी पुण्यातील शनिवारवाडा देखील याच वृत्तीची साक्ष देतात. तर, ‘विविधता शोधा आणि अनुभवा’ अशी यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना असल्याचा उल्लेख काही ठिकाणी दिसतो. या दोन्हींमध्ये अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे साम्य आहे. मानव समुदायांतील वैविध्य शोधले, डोळसपणे अनुभवले आणि ते जपण्याचा सौहार्दपूर्ण प्रयत्न केला तर संघर्ष आपोआपच टळतील आणि पुढच्या पिढ्यांसाठी संपन्न वारसा जपला जाईल.

म्हणूनच, भविष्यातील शांती, समृद्धी तसेच संपन्नता शोधण्यासाठी भूतकाळात डोकवावे आणि वारशाच्या आरशात आपलेच प्रतिबिंब पाहावे, असे समजावून सांगणारा जागतिक वारसा दिन महत्त्वपूर्ण ठरतो !

GW/ML/PGB 18 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *