महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून याची झाली निवड

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७२० किमी लांबीची समृद्ध किनारपट्टी लाभलेल्या आणि त्यामुळेच मत्स्यपालनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला आता त्याचा अधिकृत राज्य मासा लाभला आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ‘शेकरु’, महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’ बरोबरचं आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पापलेट ओळखला जाणार आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवर ‘सिल्वर पापलेट’ हा मासा राज्यमासा म्हणून घोषित केला आहे. सुधीर मुनगंटीवर यांनी पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून याआधी कोणत्याही माशाच्या प्रजातीला मान्यता मिळाली नव्हती, पण आता ‘सिल्वर पापलेट’ला ही मान्यता मिळाली आहे. मुळात यामाशाचं नाव पॉम्फ्रेट (Pomfret) असे आहे. मात्र या माशाला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हणून ओळखले जाते.
पापलेट संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी जवळील भागात आढळतो. श्रीमंतवर्ग पापलेट मासा खाण्याला जास्त प्राधान्य देतात. पापलेट मासा महागड्या माशांपैकी एक आहे. कारण तो कमी प्रमाणात सापडतो.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत पापलेटला विशेष स्थान आहे. पापलेट नामशेष होऊ नये म्हणून प्रबोधन व नियमन होण्याच्या दृष्टिकोनातून तो राज्य मासा म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांकडून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आले होते. या मागणाचा विचार करून आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात पापलेट मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हे क्षेत्र ‘गोल्डन बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. पापलेट हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त निर्यात केल्या जाणाऱ्यांपैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि पसंतीचे एक सागरी अन्न आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने सिल्व्हर पॉमफ्रेटचे महत्त्व जाणून ऑक्टोबर २०२२ मध्ये टपाल तिकीटसुद्धा प्रसिद्ध केले आहे.
SL/KA/SL
5 Sept. 2023