खाजगी ट्रॅव्हल्समध्येही आपत्कालीन सूचना देणे आता बंधनकारक

नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासगी बसेसच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येणार आहे. राज्य परिवहन विभागाने या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमानात आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना एअर होस्टेसकडून दिली जाते. तीच पद्धत आता खाजगी बसमध्ये ही बंधनकारक करण्यात येणार आहे. नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहन विभागाने काही निर्णय घेतले आहे. यामध्ये बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे. एवढंच नाही तर विमान प्रवासात ज्या पद्धतीने एअर होस्टेस आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे याची सूचना प्रवाशांना देते. तशाच पद्धतीच्या सूचना बस प्रवास सुरू होण्याआधी प्रवाशांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात बस भाड्यामध्ये प्रवाशांची होणारी लूट लक्षात घेता एसटीच्या भाड्यापेक्षा कमाल दीडपट भाडं खाजगी बस वाहतूकदारांना ( ट्रॅव्हल्स कंपनीला ) घेता येईल अशी सूचनाही परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त भाडे घेतल्यास खाजगी ट्रॅव्हल्स विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
SL/KA/SL
3 Nov. 2023