आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपाला महाविकास आघाडी, महायुतीच्या नेत्यांना निमंत्रण
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीची राज्यभर आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. या यात्रेची समारोप सभा औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि अमोल कोल्हे तसेच महायुतीकडून छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आम्ही मंडल दिनासाठी आमंत्रित केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, 7 ऑगस्ट हा दिवस ‘मंडल दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. 7 ऑगस्ट 2024 पासून वंचित बहुजन आघाडी दरवर्षी ‘मंडल दिन’ साजरा करेल. 7 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घोषित झाला होता.
मनोज जरांगे यांना बाळासाहेब आंबेडकर हे भेटायला गेले होते, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली होती की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. मात्र, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. असेही मोकळे यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आलेली आहे. यामध्ये विविध ओबीसी संघटना, त्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राजकीय पक्षातील काही नेत्यांना निमंत्रण दिले आहे.
SW/ML/PGB
1 Aug 2024