आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकारविरोधात न्यायालयात
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी देणे ही जबाबदार शासनाचे कर्तव्य मानले जाते. मात्र अनेकदा खेळाडू मैदान गाजवत असतात तो पर्यंतच त्यांना महत्त्व दिले जाते. त्यानंतर शासनाकडून योग्य ते सहकार्य होत असल्याचे दिसत नाही. असाच प्रकार आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळच्या बाबतीत घडला आहे. आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्रच्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोप दत्तू भोकनळने केला आहे. दरम्यान, मागील महिन्यात ११६ खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षकपदाची नोकरी देण्यात आली. त्यातही दत्तूला स्थान देण्यात आलेले नाही.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने देखील काही दिवसांपूर्वीच खेळाडूंना नोकरी देण्याबाबतच्या सरकारच्या भूमीकेबाबत नाराजी व्यक्त करत, कायदेशीर भूमिका घेणार असल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत हीची नियुक्ती करण्यात आली. मात्र या नियुक्तीवर कविता राऊत समाधानी नाही. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ती न्यायालयात जाणार आहे. आता दत्तू भोकनळही न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय होत आहे. २०१७ ला नोकरीसाठी अर्ज करुन देखील शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून देखील सरकार याबाबत दखल घेत नाही. ललिता बाबरला एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय दिला जात आहे. त्यामुळे मी सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे दत्तू भोकनळ याने सांगितले.
SL/ML/SL
1 Oct.2024