रेल्वे परिसरात नाल्यातून काढलेला गाळ, राडारोडा उचलण्याच्या सूचना

 रेल्वे परिसरात नाल्यातून काढलेला गाळ, राडारोडा उचलण्याच्या सूचना

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ १ अंतर्गत येणारी मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची आज ( १३ एप्रिल) पाहणी करण्यात आली. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात संभाव्य आव्हानांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाय करण्याच्या दृष्टीने या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी त्यासाठी उपस्थित होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यातून काढलेला गाळ तसेच राडारोडा उचलणे, यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना यंत्रणांना यावेळी देण्यात आल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच (९ एप्रिल ) पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँट रोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने उपायुक्त डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे यांनी आज रेल्वे स्थानकांची पाहणी केली.

बी विभागातील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक येथील स्थळ पाहणी दरम्यान बी विभागाचे सहायक आयुक्त उद्वव चंदनशिवे, सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक विनायक शेवाळे तसेच बी विभागातील विविध खाते प्रमुख उपस्थित होते.

सँडहर्स्ट रोड रेल्वे रुळालगत असलेल्या इमारतीची पाहणी करुन पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात; तसेच रेल्वे अंतर्गत असलेल्या ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा उचलण्यात यावा; नियमितपणे नाले स्वच्छता करावी, असे निर्देश उपायुक्त डॉ. हसनाळे यांनी दिले. त्यानंतर, बी विभाग आपत्‍कालीन नियंत्रण कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील यंत्रणेचा देखील त्यांनी आढावा घेतला. हॉट लाईनवरून मुख्‍य कार्यालयाशी स्वतः संपर्क करून यंत्रणा योग्‍य रितीने कार्यान्वित असल्‍याची खात्री केली. त्यासोबत, नियंत्रण कक्षामधील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

SW/ML/SL

13 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *