#अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने 2021 वर्ष कसे असेल ते जाणून घ्या
नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सन 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परंतु नवे वर्ष 2021 आपल्यासोबत अनेक मोठे बदल आणेल. अशा परिस्थितीत, 2021 मध्ये येऊ शकतील असे चढ-उतार, पुनर्प्राप्ती आणि संधींचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. पतमानांकन संस्था इंडिया रेटिंग्जच्या अहवालानुसार, 2021-22 मध्ये देशाचा जीडीपी वास्तविक आधारावर 147.17 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. पुढील आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांच्या दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु वास्तविक आधारावर हिशोब केल्यास, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर केवळ एक टक्का राहील अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार 2011-12 च्या मुल्यानुसार 2019-20 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 145.66 लाख कोटी रुपये होता. वास्तविक आधारे अर्थव्यवस्थेच्या आकडेमोडीत महागाईचा परिणामदेखील जोडण्यात येतो. चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 7.8 टक्क्यांनी घटून 134.33 लाख कोटी रहाण्याची शक्यता आहे. परंतु 2021-22 मध्ये ती 9.6 टक्के दराने वाढून 147.17 लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.
निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या मते, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 10 टक्के दराने वाढेल. तसेच वर्षाच्या अखेरीस देशाची अर्थव्यवस्था पूर्व कोविड स्थितीत पोहोचेल. निती आयोगाने आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस म्हणजेच मार्च 2022 पर्यंत देशाच्या आर्थिक वाढीचा दर कोव्हिड-19 साथीच्या आधीच्या पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. .
एंजल ब्रोकिंग लिमिटेडमधील डीव्हीपी-इक्विटी धोरणतज्ञ श्रीज्योती रॉय यांच्या म्हणण्यानुसार, विषाणूविरूद्धच्या लढाईच्या संदर्भात मॉडर्ना आणि फायझर सारख्या बायोटेक आणि फार्मा कंपन्यांकडून मिळालेल्या सकारात्मक बातमीमुळे बाजारपेठेच्या मानसिकतमेध्ये सुधारणा झाली आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याने प्रत्येकाला आनंदी होण्याचे कारण दिले आहे.
लस चाचण्या, प्रोत्साहन पॅकेज आणि औद्योगिक घडामोडींच्या वाढीच्या बातम्या बाजारपेठांना मध्यम आणि दीर्घ कालावधीची कामगिरी दाखविण्यासाठी महत्त्वाचा आधार देतील. मात्र तात्पुरत्या बाजार सुधारणांबाबत गुंतवणूकदारांकडून काही सावध भूमिका घेतली जाऊ शकते, परंतु एकूणच अंदाज आर्थिक वर्ष 2022 आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये सकारात्मक राहील.
वाहन, सिमेंट आणि ग्राहक टिकाऊ क्षेत्र देखील चांगली कामगिरी करतील, कारण अर्थव्यवस्थेची प्रगती सुरूच आहे.
श्री ज्योती रॉय यांनी सांगितले की मे महिन्या नंतर भारतात एफआयआय प्रवाहात अभूतपूर्व वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, ऑगस्टमध्ये मासिक एफपीआय गुंतवणूक 47,080 कोटी रुपये होती, जी नोव्हेंबरअखेरपर्यंत झपाट्याने वाढून 60,358 कोटी रुपयांवर गेली. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात एफपीआय गुंतवणूकीत 26,200 कोटींपेक्षा जास्त होती.
इक्विटी बाजारांच्या बाबतीत, 2021 च्या अखेरीस उच्च परतावा मिळण्याची अपेक्षा आहे, मात्र बाजाराच्या पुनर्प्राप्तीनंतर 10-12 टक्क्यांचा परतावा आधीच मिळाला आहे. म्हणूनच, 2021मध्ये एकंदरीत चित्र चमकदार बनले आहे, ज्यात आशियाई अर्थव्यवस्था पूर्वीच्या तुलनेत खुपचे वेगाने प्रगती करत आहे.
Tag-Indian Economy/ Performance/ Year 2021
PL/KA/PL/2 JAN 2021