आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने केली पदकांची लयलूट

येचॉन,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर खेळांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय युवा ॲथलेटिक्स यश संपादन करत आहेत. दक्षिण कोरियातील येचॉन येथे नुकत्याच झालेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारताच्या लक्षिता शांडिल्यने मुलींच्या पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने पदकतालिकेत १९ पदकांसह तिसरे स्थान मिळविले.गुजरातमधील वडोदरा येथील असलेल्या १८ वर्षीय लक्षिताने ४ मिनिटे २४.२३ सेकंदांत पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळही ठरली.
याशिवाय मुलींच्या ४-४०० मीटर रिले संघानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. यात महाराष्ट्राच्या अनुष्का कुंभार व रिया पाटीलचा समावेश आहे. याशिवाय कनिस्ता व रेझोना मलिक या अन्य दोन धावपटू होत्या. या चौकडीने ३ मिनिटे ४०.४९ सेकंद अशी वेळ दिली. अनुष्काचे हे दुसरे पदक ठरले. ४-४०० मिश्र रिले शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या संघातही तिचा समावेश होता. मुलांच्या ४-४०० मीटर रिले संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत मेहंदी हसनने ब्राँझपदक जिंकले, तर पाच हजार मीटर शर्यतीत शिवाजी परशूला रौप्यपदक मिळाले. भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण, सात रौप्य व सहा ब्राँझपदके जिंकली व पदकतालिकेत जपान व चीनपाठोपाठ तिसरे स्थान मिळविले. भारताबाहेर झालेल्या स्पर्धेत ही भारतीय संघाची पदकाच्यादृष्टीने सर्वोत्तम कामगिरी आहे.
SL/KA/SL
8 June 2023