दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार दिल्ली महिला आयोगातून 223 कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे.
स्वाती यांनी जानेवारी 2024 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आम आदमी पार्टीच्या वतीने अरविंद केजरीवाल यांनी त्यांना राज्यसभेच्या खासदारपदासाठी उमेदवारी दिली होती.स्वाती मालीवाल यांना 2015 मध्येच दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनवले होते. त्यापूर्वी त्या सीएम केजरीवाल यांच्या सल्लागार होत्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) स्वाती यांच्याविरुद्ध आयोगात बेकायदेशीर नियुक्ती केल्याच्या आरोपावरून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
आयोगात नेमलेल्या लोकांची चौकशी केल्यानंतर 91 नियुक्त्यांमध्ये नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा दावा एसीबीने केला आहे. त्यावेळी स्वाती मालीवाल यांनी तुरुंगात गेले तरी आपले काम थांबणार नाही, असे म्हटले होते. कारागृहातील महिलांच्या स्थितीवर अहवाल तयार करून ते दिल्ली सरकारला सादर करत राहतील.
SL/ML/SL
2 May 2024