#भारतीय अर्थव्यवस्था विक्रमी झेप घेईल: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
वॉशिंग्टन, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात जोरदार झेप घेईल आणि विक्रमी 11.5 टक्क्यांनी वाढेल. आयएमएफने म्हटले आहे की साथीच्या दरम्यान मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये एकमेव भारतच दुहेरी आकडी विकास दर साध्य करणारा देश असेल.
आयएमएफने मंगळवारी जाहीर केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या ताज्या स्थितीमध्ये (वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट) भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर 2020 मध्ये कोरोना साथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत विक्रमी घसरण झाली होती आणि त्यात 8 टक्के घसरण होण्याचा अंदाज आहे. आयएमएफने म्हटले आहे की 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 11.5 टक्क्यांच्या गतीने वाढेल आणि मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये हा एकमेव देश असेल ज्याचा वेग दुहेरी आकड्याचा असेल. पुढचा क्रमांक चीनचा आहे, ज्याचा 8.1 टक्के गतीचा अंदाज आहे. त्याखालोखाल स्पेन (5.9 टक्के) आणि फ्रान्स (5.5 टक्के) आहेत.
2020 साठीच्या आपल्या अंदाजामध्ये सुधारणा करत आयएमएफने सांगितले आहे की भारतीय अर्थव्यवस्था 8 टक्क्यांनी घसरु शकेल. मोठ्या देशांमध्ये केवळ चीनचा विकास दर सकारात्मक (2.3 टक्के) राहू शकेल. आयएमएफने असेही म्हटले आहे की 2022 मध्ये भारत 6.8 टक्के वेगाने वाढू शकेल तर चीनचा वेग 5.6 टक्के असू शकेल. आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार, भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेचा लौकिक पुन्हा प्राप्त करेल.
Tag-IMF/Report/Indian Economy
PL/KA/PL/27 JAN 2021