हवामान खात्याने जाहीर केला मे महिन्यातील संभाव्य हवामान अंदाज
पुणे,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याचा पहिला आठवडा सरत आला तरी राज्यात अद्याप उन्हाळ्याचे वातावरण अनुभवास येत नाही. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. उन्हाळा असताना देखील अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. पुणे, मुंबईत ३२ आणि ३३ अंश तापमान आहे. यामुळे मे महिन्यातील अंगाची लाहीलाही जाणवत नाही. दुसरीकडे अवकाळीचे संकट कायम आहे. कोकण आणि गोव्यात ४ ते ७ मे पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात ४ ते ८ मे पर्यंत यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात ४ ते ७ मे दरम्यान अवकाळीचे संकट आहे तर विदर्भात ४ ते ६ मे पर्यंत पाऊस पडणार आहे.
राज्यात ५ ते ११ मे दरम्यान तापमान वाढीतून दिलासा मिळणार आहे. या काळात तापमान ४० अंशाच्या आत असणार आहे. परंतु त्यानंतर १२ ते १८ मे दरम्यान तापमानात वाढ होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूरचे नोंदवले गेले. सोलापूरमध्ये ३६.६ अंश तापमान होते तर मुंबईत ३३.२ अंश तापमान होते. पुण्याचे तापमानही ३३.९ अंशांवर होते.
दरम्यान यावर्षी पावसाळा मिश्रित उन्हाळा अनुभवास येणार असल्याचे चित्र हवामान खात्याच्या या अंदाजात दिसून येत आहे.
SL/KA/SL
5 May 2023