ICMR चा सावधगिरीचा इशारा , H3N2 व्हायरसच्या रुग्णांत वाढ
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने स्पष्ट केले आहे
H3N2 प्रादुर्भावाची लक्षणे
H3N2 विषाणू इतर इन्फ्लूएंझा विषाणूंपेक्षा जास्त संसर्गजन्य आणि गंभीर लक्षणे निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो.रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाच्या संसर्गासोबतच डोकेदुखी-शरीर दुखणे, सर्दी-खोकला, तीव्र तापाचा त्रास ही लक्षणे आढळून येतात.
इन्फ्लूएंझा हा फारसा गंभीर नसला तरी ICMR च्या अहवालानुसार H3N2 विषाणूची लागण झालेल्या अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. या रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक लोकांना ताप-कफ जास्त आहे, 27 टक्के लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, 16 टक्के लोकांना न्यूमोनिया आणि 6 टक्के लोकांना झटके येण्याची समस्या दिसून आली आहे. गंभीर आजारामुळे आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागलेले सुमारे 7 टक्के लोक आहेत.
अँटीबायोटिक्स टाळा
वायू प्रदूषणामुळे व्हायरल रुग्णांत वाढ झाली आहे, ICMR म्हटले आहे. हे व्हायरल रुग्ण मुख्यतः 15 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आहेत. त्यांच्यात तीव्र तापासह, श्वसनमार्गाशी संबंधित संसर्ग आढळत आहे. असोसिएशनने डॉक्टरांना रुग्णांना अँटिबायोटिक्स नव्हे तर केवळ लक्षणात्मक उपचार लिहून देण्यास सांगितले.
SL/KA/SL
5 March 2023