पहलगाम प्रकरणी दोन अतिरेक्यांची घरे उध्वस्त

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता धडक कारवाई करत आहेत. एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पहलगाम हल्ल्यात सहभागी दोन दहशतवाद्यांच्या घरांवर शुक्रवारी (२५ एप्रिल) संरक्षण यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी धाडी मारल्या. त्यापैकी एका दहशतवाद्याचं घर प्रशासनाने उद्ध्वस्त केलं, तर दुसऱ्याचं घर अज्ञातांनी बॉम्बने उडवलं. यापैकी एका दहशतवाद्याचं नाव आसिफ शेख असून काश्मीर खोऱ्यातील त्राल येथील त्याचं घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आलं आहे तर, त्याचा साथीदार आदिल हुसैन याचं घर बॉम्ब स्फोटात (आयईडी) बेचिराख झालं आहे.
पोलीस आसिफच्या घरी तपास करत असतानाच त्यांना घरात काही संशयित वस्तू व स्फोटकं आढळली. त्याचदरम्यान या घरात मोठा स्फोट होऊन घर बेचिराख झालं. पोलीस त्राल येथील आसिफ शेख याच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथे काही संशयित वस्तू आढळल्या होत्या. पोलिसांनी सांगितलं की घरात आम्हाला स्फोटकं दिसली होती जी आम्ही जप्त करण्याआधीच स्फोट झाला. घरात स्फोटकं पाहिल्यानंतर पुढचा धोका ओळखून पोलीस व संरक्षण दलाचे जवान मागे हटले. तेवढ्यात घरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आसिफचं घर बेचिराख झालं. अतिरेक्यांनी पोलीस व गुप्तचर यंत्रणा या घरी धडकतील आणि तपास करतील याचा अंदाज घेऊन आधीच टाईम बॉम्ब ठेवली असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.