होलिकादहन
मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन): हुताशनी पौर्णिमा- अर्थात होळी. अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा, सद्गुणांचा स्निग्ध प्रकाश पसरविणारा हा तेजोत्सव! या तिथीलाच विष्णुभक्त प्रह्लादाची आत्या- हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिचा अंत झाला.
एक पौराणिक कथा असे सांगते की, हिरण्यकश्यपू आपल्या मुलाच्या जिवावर उठला होता. ‘अग्नीने जळू शकणार नाही’ असे वरदान असलेल्या होलिकेच्या मांडीवर त्याने लहानग्या प्रह्लादाला ठेवले आणि चहूबाजूंनी आग लावून दिली. त्या अश्राप बालकाच्या मृत्यूची अमंगळ इच्छा धरून बसलेल्या होलिकेच्या बाबतीत घडले विपरीतच. नामस्मरणाचे आणि सदाचरणाचे सुरक्षाकवच असलेल्या प्रह्लादाला आगीचा जराही त्रास झाला नाही, उलटपक्षी, न जळण्याचे वरदान असलेली होलिका मात्र दुर्विचारांनी ग्रस्त असल्यामुळे भस्मसात झाली. हा झाला या उत्सवाचा पौराणिक संदर्भ.
याखेरीज सामाजिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय दृष्टीनेही होलिकोत्सवाचा अर्थ बघितला पाहिजे.
‘दुष्प्रवृत्तींचा निश्चितपणे नाश होतो’ हे सांगणारी होळी म्हणजे भारतीय जनमानसाला पिढ्यानुपिढ्या पटलेला उत्सव. सदाचरणावरचा, सत्प्रवृत्तीवरचा विश्वास दृढ करणारा हा उत्सव. भारतीय कालगणनेचा विचार करता, शेवटच्या महिन्यात म्हणजे फाल्गुनात हा उत्सव साजरा केला जातो.
गेल्या वर्षात घडून गेलेल्या अमंगळाचा नाश करून टाकण्याची प्रेरणा होलिकोत्सवाद्वारे समाजाला मिळते. ‘परस्परांतील वैर, वैमनस्य, साचून राहिलेली नकारात्मकता या सर्वांची राख होऊन जाऊदे’ अशी प्रार्थना या उत्सवाच्या निमित्ताने केली जाते. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वी केलेली – ‘जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका…’ अशाच अर्थाची ही कृती नव्हे काय?
त्यानंतर येणाऱ्या रंगांच्या उत्सवाचा उत्साह तर काय वर्णावा ! उत्तर भारतात धुळवडीला म्हणजे होळीपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात मात्र त्या दिवसाला धूलिवंदन म्हणतात आणि काही ठिकाणी तेव्हा होळीची राखच फसतात. तर आपल्याकडे रंगपंचमीच्या दिवशी- म्हणजे फाल्गुन कृष्ण पंचमीला रंग खेळण्याची प्रथा आहे.
नकारात्मक गोष्टींच्या नावाने बोंब ठोकून आणि त्यांची राख होऊन जाण्याची प्रार्थना करून झाली, की नात्यांना नवे रंग देऊन, टवटवीत उत्फुल्ल मनाने नववर्षासाठी सज्ज होण्याची ही प्रथा किती मनोज्ञ आहे ! आपणही यातून प्रेरणा घेऊन- शाश्वत आनंदासाठी स्वतःच्या मनातील निराशा, भीती, चिंता, तणाव आदी नकारात्मक भावनांची होळी करून जीवनात नवे रंग भरायला काय हरकत आहे?
नकोशा वाटणाऱ्या गोष्टींची होळी करून टाकण्याचा प्रभावी उपाय भारताच्या स्वातंत्र्य-चळवळीतही कल्पकतेने उपयोगात आणला गेला. १९०५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी पुण्यात पेटवलेल्या ‘परदेशी कपड्यांच्या होळीच्या’ माध्यमातून आपल्या झुंजार स्वातंत्र्यसैनिकांनी खरा जाळला तो परकीय सत्तेचा अहंकार ! लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वात धडाडून पेटलेल्या या होळीची धग थेट इंग्लंडपर्यंत पोहोचली, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही!
आध्यात्मिक दृष्टीने पाहायचे तर, होळीचे रूपक घेऊन आपल्या संतांनी अत्यंत अर्थपूर्ण आणि सुंदर रचनांच्या माध्यमातून मोक्षमार्ग सांगितला आहे. अंतरंगातील सत्याचा शोध घेण्याचा संदेश देऊन संसाररूपी शिमगा समूळ नष्ट करण्याचे कार्य, संतांची मांदियाळीच करू जाणे! संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात-
‘देहचतुष्टयाची रचोनि होळी । ज्ञानाग्नी घालुनी समूळ जाळी ।।
धावण्या धावती संत अंतरंग । संसार शिमगा सांग निरसती ।।’
समर्थ रामदास स्वामींनीही ‘अवघेचि बोंबलती । होळी भोवते भोवती’ या भारुडात होलिकोत्सवाची सृष्टीशी सांगड घालून दाखवली आहे. त्यात ते शेवटी म्हणतात, ‘रामी रामदासी होळी । केली संसाराची धुळी ।’ संसार हीच मायारूप होळी असून, रामाचे दास्य स्वीकारून त्यांनी ती मायेची होळी पेटवली आणि तिचेच भस्म अंगाला फासून धूळवडही साजरी केली.
पर्यावरणाच्या दृष्टीने मात्र या उत्सवाकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहणे ही आपली जबाबदारी होय. जेव्हा ही प्रथा पडली तेव्हा माघातील महाशिवरात्रीपासून कडाक्याची थंडी किंचितशी मंदावत असे. तरी, फाल्गुन पौर्णिमेला थंडी असेच. त्यामुळे होळ्या पेटून उष्मा वाढला तरी ते त्रासदायक ठरत नसे. आताही खेड्यांमध्ये तशीच स्थिती असली तरी शहरांत आणि त्यातही महानगरांत परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.
काँक्रीटच्या जंगलात मार्चमध्येच लोकांना उकाडा जाणवू लागला आहे. वातानुकूलन यंत्रणांचा वापर दरवर्षी वाढत चालला आहे. असे असताना केवळ प्रथा म्हणून गल्लोगल्ली होळ्या पेटवण्याने, उष्मा आणि कोंदलेला धूर यांत प्रचंड वाढ होते. आधीच शहरांतील झाडे संकटग्रस्त असतात. त्यात ज्यांनी कधीही एकाही झाडाची काळजी घेतली नाही, असे हात होळीसाठी लाकडे पेटवायला एकत्र आले तर शहरांतील वृक्षजीवनाचे काय व्हावे? यासाठीच, थोडासा विवेक बाळगून वेगळा विचार करणे आवश्यक आहे.
जास्त मंडळांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केल्यास, पेटणाऱ्या होळ्यांची संख्या कमी होईल. त्या एकत्र आलेल्या लोकांनीच वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले तर शहरांचे चित्र सुखावह होईल. यावर्षी, आपल्यातील दुष्प्रवृत्तींच्या होलिकादहनाचा आणि वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडून होलिकोत्सवाचा आनंद घेऊया!
ML/KA/PGB
5 Mar. 2023