जोरदार पाऊस, अग्रणी नदीला पूर; द्राक्षबागा पाण्यात …
सांगली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील सावळज सह परिसरातील गावामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ओढे – नाले भरुन वाहते झाल्याने अग्रणी नदीला पूर आला. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत.
तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडळातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढलेले आहे. तालुक्यात दोन दिवसामध्ये ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस तालुक्यात पडणा-या वार्षिक सरासरी पावसाच्या ११ टक्के एवढा आहे. ओढे आणि नाले तुडूंब भरून वाहू लागले होते. अग्रणी नदीला पूर आला. गव्हाण आणि मळणगाव हद्दीतील अग्रणी पात्रातील पूल पाण्याखाली गेले.
तालुक्यातील सर्वच गावातील शेतात तुडूंब पाणी भरलेले दिसत होते. द्राक्षबागांचे वाफे पाण्याने भरलेले आहेत. दरम्यान या पावसाचा चांगलाच फायदा येणा-या खरीप हंगामाला होणार आहे. तसेच द्राक्षबागांच्या खरड छाटणी हंगामातील द्राक्ष काडीच्या गर्भधारणेस होणार आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे असे वातावरण आहे. तर हवेतील उष्णता जाऊन गारवा निर्माण होण्यास या पावसाचा फायदा झाला आहे.
ML/ML/SL
11 June 2024