नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा

नागपुर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर , चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवार, 16 मार्च व शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दुरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे.
वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन बिदरी यांनी केले आहे.Heavy rain warning with hail for four days in Nagpur division
ML/KA/PGB
15 Mar. 2023