कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट ही जारी

 कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट ही जारी

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई महानगर परिसरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झाले. मध्य रेल्वेवरील वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस झालेल्या तुफानी वृष्टीनंतर आता पुढील २४ तासांत देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २५० मिमीहून अधिक पाऊस झाला असून तर सिंधुदुर्गा २१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापुढील २४ तासांत देखील अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले आहे. समुद्रामध्ये उंच लाटा उसळत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास समुद्र खवळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी मच्छीमारांना समुद्रात जाण्याची बंदी असून नागरिकांना देखील सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये देखील रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पुढील काही तासांसाठी या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणार आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रती तास राहणार असून मुंबईसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड किल्ले परिसरात काल सायंकाळी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे प्रथमच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळ विक्राळ स्वरुपात पाणी वाहू लागल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पोलीसांनी सुमारे ३०० पर्यटकांना सुखरुप गडाखाली आणले. खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि NDRF यंत्रणा आपत्ती नियंत्रणासाठी सज्ज झाल्या आहेत.

मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील मोठा फटका बसला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २१६ मिमी पाऊस झाला आहे. सावंतवाडी तालुक्यात सर्वांधीक म्हणजे २७० मिमी इतका पाऊस नोंदवला गेला. तर सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील तेरेखोल, कर्ली नद्या ओसंडून वाहत आहेत . काही बाजारपेठेत देखील पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर आजही रेड अलर्ट जारी केला असून खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहे.

ML/ML/SL

8 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *