हार्दिक सानेची हिमालयातल्या युनाम शिखरावर यशस्वी चढाई

 हार्दिक सानेची हिमालयातल्या युनाम शिखरावर यशस्वी चढाई

वसई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील शिरवली गावचा रहिवासी असलेल्या हार्दिक नितीन साने या तरूणाने हिमालयातील सुमारे 20 हजार 49 फूट (6 हजार 111 मिटर) उंच असलेल्या युनाम शिखरावर यशस्वी चढाई करत वसई तालुक्याचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात उज्वल केले आहे.

हार्दिक हा वसई तालुक्यातील प्रसिद्ध गिर्यारोहक असून आजपर्यंत त्याने जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टचा बेस कँम्पपर्यंतचा (पायथा) प्रवास पूर्ण केला आहे. तसेच युटी कांगरीसारखे खडतर शिखर सर करून त्याने ग्रामीण वसईचे नाव देशस्तरावर उंचावले आहे. आता त्याने माऊंट युनाम हे शिखर सर करून वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

12 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण संस्थे’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिमालयातील युनाम या उंच शिखरावर मनाली येथून चढाई करण्यास हार्दिक याने सुरूवात केली. या मोहिमेचा समारोप मनालीच्या पर्वतारोहण उपकेंद्र जिस्पा येथे झाला. मात्र मोहीम पूर्ण झाल्यानंतरदेखील मनालीत झालेल्या भूस्खलनामुळे हार्दिकला काही दिवस मनालीतच अडकून पडावे लागले. मोहिम आटोपवून हार्दिक आता आपल्या शिरवली येथील घरी परतला आहे.

हिमालयातील युनाम हे शिखर गिर्यारोहण क्षेत्रातील दुर्मिळ ट्रेकपैकी एक मानले जाते. तसेच या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 20 हजार 49 फूट अर्थात 6 हजार 111 मिटर उंच आहे. युनाम हे उंच शिखर हिमाचल प्रदेशातील लाहौल जिल्ह्यातील प्रसिद्ध बरलाचाला पासजवळ आहे. समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणावर गेल्यानंतर शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी वेळ द्यावा लागतो.

शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे लागते. त्यासाठी सतत पाणी पिणे, दिवसा झोपणे, शारीरिक हालचाली करत राहणे आवश्यक असते. हळूहळू उंची गाठत जावे लागते. आवश्यक ती सर्व काळजी घेत हार्दिक याने युनाम शिखर चढाईला सुरूवात केली होती. अणकुचीदार दगड, खडकांनी आच्छादलेला रस्ता आणि शेवटच्या टप्प्यात बर्फ असा हा माऊंट युनाम शिखरापर्यंतचा प्रवास हार्दिकने पूर्ण केला. हार्दिक याला गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट खुणावत आहे.

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल महिन्यात जुळवाजुळव झाल्यास हे शिखर सर करण्याचा त्याचा मानस आहे. दरम्यान, तब्बल 6 हजार 111 मिटर उंच असलेले माऊंट युनाम शिखर सर करण्यात हार्दिकने यश संपादन केल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ML/KA/SL

21 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *