गुढीपाडवा आणि वर्षारंभ

 गुढीपाडवा आणि वर्षारंभ

मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन):  चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. संपूर्ण भारतभर नव्या वर्षाची सुरुवात या दिवशी करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांनी लंकाविजयानंतर अयोध्येत प्रवेश केला तो दिवस आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला धार्मिक महत्त्वही आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, पंचांगवाचन वगैरे करण्याची अनेक ठिकाणी पद्धत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक कर्माचा भाग म्हणून गुढी उभारण्याची प्रथा मात्र महाराष्ट्रातच प्रकर्षाने दिसून येते. 

सध्या ज्या पद्धतीने घरोघरी गुढी उभारली जाते- म्हणजे काठी, तांबडे वस्त्र, हार, गोडाची/ साखरगाठींची माळ, कलश अशी गुढी बांधून तिची पूजा करणे- त्या पद्धतीचा सर्वात अलिकडचा उल्लेख एकोणविसाव्या शतकातल्या ‘व्रतशिरोमणी’ या ग्रंथात आलेला दिसतो. त्यात त्या ग्रन्थकाराने महाभारतातल्या चेदी राजाच्या गोष्टीचा संदर्भ देऊन, संरक्षण आणि अनुशासनाचे प्रतीक म्हणून गुढीचा उल्लेख केला आहे.

 सोळाव्या शतकाच्या पूर्वीही गुढ्या उभारल्या जात, परंतु त्या केवळ चैत्र शुद्ध प्रतिपदेचा धार्मिक विधी म्हणून उभारल्या जात नसत, तर विजयाचे, स्वागताचे, आनंदाचे द्योतक म्हणून किंवा घराची सजावट म्हणूनही गुढीकडे पाहिले जाई. संतवाङ्मयामध्येही याचे उल्लेख आहेत. ज्ञानेश्वर माउली म्हणतात- भगवंत अवतार घेऊन अधर्म आणि जनांचे दोष नष्ट करतात आणि मग- ‘सज्जनाकरवी गुढी । सुखाची उभवीं ।।’ तर संत चोखामेळा पंढरीची वाट धरण्याबद्दल सांगतात- “टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट ही चालावी पंढरीची ।।” इसवीसनाच्या अकराव्या शतकातील लीळाचरित्रामध्ये ‘गुढारले (सजविले)’, ‘गुढारू आंबा (डेरेदार आम्रवृक्ष)’ असे उल्लेख आढळतात.

 कानडी, तुळू, तेलगू या भाषांमध्ये सौंदर्यपूर्ण गोलाकार दाखवण्यासाठी ‘गुढी’च्या जवळचे शब्द प्रचलित आहेत. तात्पर्य, भाषा आणि संस्कृती यांचे साहचर्य विचारात घेता, गुढीचा सामाजिक-

धार्मिक-भाषिक-सांस्कृतिक असा बहुपेडी संदर्भ उलगडतो. 

महाराष्ट्रातील गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने शक राजवटीचा दणदणीत पराभव केला, त्या विजयाची स्मृती म्हणून सध्याची शक कालगणना सुरु झाल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. काश्मीरमध्येही एका राजाने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा असल्याचा उल्लेख इतिहासकार अल बिरौनीने केला आहे. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते.

 पिढ्यानुपिढ्यांपासून या सुमाराला देशभरात बिहू (आसाम), युगादी/ उगादी (दक्षिण भारत), साजिबू चेरोबा (मणिपूर), विशू (केरळ), पोयला बैशाख (पश्चिम बंगाल) अशा निरनिराळ्या नावांनी सणवार साजरे होतात.

 निसर्गाच्या सर्जनशक्तीला वंदन करण्याचाच त्यात सर्वत्र उद्देश असतो.

थोडक्यात, वसंत ऋतूमध्ये सारी सृष्टी सृजनाच्या रंगांमध्ये नाहून निघालेली असताना वाजतगाजत नववर्षाचा प्रारंभ करणे भारतीय मनाला रुचते. ध्वजाचे महत्त्व भारतवर्षाला किमान ५ हजार वर्षांपासून ठाऊक आहे. त्यामुळे, ‘दुष्ट शक्तींचे निवारण करणारा ध्वज’ गुढीस्वरूपात घरावर लावण्याची आणि त्याच्या मंगल सान्निध्यात नववर्षाचे श्रद्धापूर्ण स्वागत करण्याची पद्धत किती सार्थ वाटते ! 

पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या आणि सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडुलिंबाचाही समावेश गुढीमध्ये करून, त्याचे सेवन करणे- ही रीतही विविध कारणांनी महत्त्वाची वाटते. कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, असे म्हटले जाते.  शिवाय, गोडाबरोबरच कडूही झेलण्याची तयारी वर्षाच्या पहिल्या दिवशीच करून घेतली जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी आणि चैत्रापासून चार महिने प्राणिमात्रांना जलदान करावे’- असे सांगितले जाते.

 नुकत्याच झालेल्या ‘चिमणी दिनानिमित्त’ घरोघरी आलेल्या आधुनिक बर्ड-फीडर्सचेच हे प्राचीन रूप नव्हे काय? किंबहुना, समाजात ती परंपरा पाळली जात असेपर्यंत पक्ष्यांसाठी असे मानवनिर्मित आसरे करावे लागत नसतील, असे नाही वाटत? सध्या समाजमाध्यमांच्या मदतीने एक विचित्र लोण पसरविले जात आहे- ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदूंचा नववर्षारंभ नाहीच’, ‘हे मराठी नववर्ष असले तरी त्यात गुढी हा एका विशिष्ट वर्गाचा अहंकार कुरवाळणारा परंतु वास्तवात अतिशय घृणास्पद प्रकार आहे’… वगैरे गरळ ओकणारे आणि कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा शास्त्राधार नसणारे संदेश पसरवले जाताहेत. आपल्या समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करणारे असे डाव हाणून पाडण्यासाठी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत.

 त्यादृष्टीने आता ठिकठिकाणी होणाऱ्या नववर्ष-स्वागतयात्रांचे / शोभायात्रांचे महत्त्व मोठे आहे. या यात्रांच्या निमित्ताने आपल्या परंपरांचा गौरव करणारी, आपले भारतीयत्व साजरे करणारी तरुणाई एकत्र येते. रांगोळी, सामूहिक वाद्यवादन, सामूहिक नृत्य अशा आपल्या पारंपरिक कौशल्यांचा जागर होतो. आबालवृद्ध स्री-पुरुष एकत्र येऊन जल्लोष करतात, आनंदाची देवाणघेवाण करून तो शतगुणित तर करतातच, पण या साऱ्यातून ऐक्यभाव वृद्धिंगत होतो.

सामाजिकतेविषयी प्रेम वाढते. ठिकठिकाणी नववर्षाचे औचित्य साधून भजन-कीर्तन-प्रवचन याबरोबरच व्याख्यानांचेही आयोजन होते. पारंपरिक युद्धकलेचे दर्शन घडवणारी शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिकेही सादर केली जातात.

 तात्पर्य, बुद्धी आणि शक्तीचा परिपोष करणारे वातावरण जनमानसात रुजवून आपण नव्या वर्षात पाऊल ठेवतो. अशी सांस्कृतिक संपन्नता पहिली की – मद्यधुंद अवस्थेत मंद प्रकाशात संगीतावर झुलत बेभानपणे नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांची कीव येते. त्याच अंधाऱ्या सवयींना कवटाळून आपल्या समाजाची अनेक वर्षे वाया गेली आणि मानसिक गुलामगिरी चालू राहिली. असो ! आता दिवस बदलत आहेत. त्याच परिवर्तनाचे सूत्रधार होऊया आणि मांगल्याचा भाव जपणाऱ्या नववर्षाचे स्वागत करूया. शके १९४५- अर्थात शोभन नाम संवत्सराच्या प्रारंभानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि आनंद घेऊन येणारे ठरो !Gudipadwa and the beginning of the year

ML/KA/PGB
10 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *