जीएसटी संकलन सलग दुसर्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांच्या वर
नवी दिल्ली दि.2(एमएमसी न्यूज नेटवर्क)- सरकारची वस्तू व सेवा कराची (जीएसटी) वसुली नोव्हेंबरमध्ये 1.04 लाख कोटी झाली आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली. मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी महसूलाच्या आकडेवारीत किरकोळ घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ती 1.05 लाख कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षात जीएसटीचे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संकलन झालेला हा सलग दुसरा महिना आहे. नोव्हेंबरमधील जीएसटी संकलन मागील वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत 1.4 टक्के जास्त आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये जीएसटी संकलन 1,03,491 कोटी रुपये झाले होते.
अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, जीएसटी महसुलात नुकत्याच झालेल्या सुधारणेच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्यातील संकलनाची आकडेवारी मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 1.4 टक्के जास्त आहे.’ निवेदनात सांगण्यात आले आहे की, आढावा घेण्यात आलेल्या महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 4.9 टक्के जास्त आहे. दुसरीकडे देशांतर्गत व्यवहारातून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 0.5 टक्के अधिक आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 1,04,963 कोटी रुपये आहे. यात केंद्रीय जीएसटी 19,189 कोटी रुपये, राज्य जीएसटी 25,540 कोटी रुपये आणि एकत्रित जीएसटी 51,992 कोटी रुपये आहे (त्यापैकी 22,078 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर गोळा झाले आहेत). यात उपकराचे योगदान 8,242 कोटी रुपयांचे (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेले 809 कोटी रुपये समाविष्ट) आहे.
मागील आर्थिक वर्ष 2019-20 मधील 12 महिन्यांपैकी आठ महिन्यांत जीएसटीचा महसूल एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. मात्र चालू आर्थिक वर्षात कोरोना विषाणूच्या साथीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जीएसटीच्या महसुलावर परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये जीएसटी संकलन केवळ 32,172 कोटी रुपये होते. मे महिन्यात जीएसटी संकलन 62,151 कोटी रुपये, जूनमध्ये 90,917 कोटी रुपये, जुलैमध्ये 87,422 कोटी रुपये, ऑगस्टमध्ये 86,449 कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये 95,480 कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये 1,05,155 कोटी रुपये होते.
Tag- India/Finance Ministry/GST Collection/1.04 Lakh Cr
PL/KA/PL/2 DEC 2020