महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम
भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय महिला संघ विश्वविजेता झाल्यास आपण एक काम करणार असल्याचं वचन दिलं आहे. जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 जिंकला तर ते जेमिमा रॉड्रिग्जसोबत ड्युएट सादर करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे.
आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर भारत स्पर्धेत विजयी झाला तर आपल्याला जेमिमासोबत गाणं गाण्यास आवडेल असं गावसकरांनी सांगितलं आहे.
“जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर ती आणि मी, जर तिची हरकत नसेल तर आम्ही एकत्र गाणं गाऊ. तिच्याकडे तिचं गिटार असेल आणि मी गाणं गाईन,” असं गावसकरांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हटलं. “काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात आम्ही खरंच असं केलं होतं. तिथे एक बँड वाजत होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटारवर होती आणि मी गायलो. पण जर भारत जिंकला तर मला ते पुन्हा करायला आवडेल – जर तिची हरकत नसेल. एका वृद्ध व्यक्तीसोबत तिला परफॉर्म करण्यास आवडत असेल तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.